*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*व्यसन कि व्यासंग…*
“व्यसन” शब्द उच्चारताच आपल्या हृदयाचा
ठोका चुकतो इतके आपण या शब्दाला घाबरतो.
आणि ते बरोबरच आहे. कारण आपल्याला आठवतो “एकच प्याला” मधील तळीराम. पहिला एकच प्याला तोंडाला लागला की त्याचे
व्यसनात कधी रुपांतर होईल ते सांगता येत नाही. म्हणून तो तोंडाला न लागलेलाच बरा.
हा एकच प्याला सवयीचा झाला की तुम्हाला
त्या पासून सुटका हवी असली तरी तो सुटत
नाही कारण ती तुमच्या आतड्यांची गरज बनलेली असते. त्या ठराविक वेळी पोटात अशा
काही हालचाली होतात की, तुम्ही कितीही निश्चय केला तरी तो ढासळतो व तुमच्या मनाविरुद्ध तुमचे पाय व हातही तिकडे वळतात
इतका तुमचा नाईलाज होऊन जातो. म्हणून सुज्ञ
माणसे कधीच या फंदात पडत नाहीत कारण पुढे काय होईल हे ते चांगलेच जाणून असतात.
तुम्ही सोडायचे ठरवले तरी” हा प्याला “ तुम्हाला
सोडत नाही.
तो सोडवण्यासाठी प्रयत्न करून वर्षभर सोडली
तरी एक वर्षानंतर पुन्हा सुरू झालेली उदाहरणे
आपल्याला सापडतात व घरच्यांचा अगदी नाईलाज होऊन जातो व मग तेही त्याचा नाद सोडून देतात. आपल्या माहितीत अशी अनेक घरे
व जवळचे नातेवाईक आहेत की या एकाच प्याल्याने त्यांना बरबाद करून आयुष्यातून उठवले आहे. मला ही व्यसन म्हटले की धडकीच
भरते.
माझे हे मनोगत वाचून खूप लोक मला गावंढळ व
बावळट तसेच मागासलेली म्हणतील हे मला चांगलेच माहिती आहे. मला त्याचे सोयरसुतक
नाही. आहेत माझी मते अशी नि ती अगदी पक्की
आहेत कारण त्यामागे माझा पन्नास वर्षांचा अनुभव आहे. मोठमोठे हायफाय लोक ह्या प्याल्याच्या आधिन आहेत. साहित्यिक राजकारणी तर त्यांनी असे केले नाही तर..?
आपली प्रतिमाच खराब होईल असे त्यांना वाटते.
आपली किंमत कमी होईल अशी त्यांना भीती
वाटते. काही काही तर अगदी हसून हसून समुहावर सुद्धा निर्लज्जपणे त्याची चर्चा करतात
व इतरांना मनातून अशा काही उकळ्या फुटतात की विचारूच नका. माझ्या संतापाला त्यावेळी
पारावार रहात नाही, भले मी ह्या बाबतीत चुकत
असेल तरी.. हो.. सर्वमान्य गोष्ट आहे ना ती!
आवाक्यात राहून नियमितपणे घेणारी काही
अत्यंत अतिशय ब्रिलियंट व उच्चपदस्थ मंडळीही
यात आहेत. औषध म्हणून ते नियमितपणे घेतात
व त्यांचा कधीच ताबा सुटत नाही. पण अशी मंडळी खूप कमी आहेत.
व्यसनाची एक वाईट बाजू आपण पाहिली.
आता “व्यसन “ शब्दाची दुसरी बाजू पाहू.
“एकच प्याल्याचे” जसे व्यसन असते तसे अनेक
चांगल्या गोष्टींचेही व्यसन असते.
हो, बाबा आमटे यांच्या सारखे समाजसेवेचे, साने गुरुजीं सारखे देशप्रेम व देशसेवेचे, सुभाष बाबू व बाबू गेनू सारखे झपाटलेपणाचे, झोकून देण्याचे, सावरकरांसारखे प्रखर राष्ट्रनिष्ठेचे, टाटाबिर्लांसारखे देश प्रगतीपथावर नेण्याचे, राजगुरू भगतसिंग यांच्यासारखे देशासाठी बलिदानाचे,सीमेवर लढून उणे पन्नास तापमानात
गस्त घालणाऱ्या आमच्या जवानांसारखे, रात्रंदिवस अभ्यास करून टॅापला राहण्याचे, अथक जागृत राहून एकही सुटी न घेणाऱ्या देशाच्या पंतप्रधानांसारखे..
अहो, किती उदाहरणे द्यावीत या उत्तम व्यसनांची!
आपल्या घराघरातील आईवडीलांनाही व्यसन असते डोळ्यात तेल घालून कुटुंब जपण्याचे, हो,
हे ही एकप्रकारचे चांगले व्यसनच आहे जे ते पडेल ती किंमत देऊन पार पाडतात. हो की नाही? तर अशी हजारोंनी उदाहरणे देता येतील
जी राष्ट्र बांधणारी व्यसने आहेत व असावीच.
उत्तम साहित्यिकांनाही संस्कार, राष्ट्रप्रेम व राष्ट्रोद्धाराचे व्यसन असते व आपली लेखणी चौफेर चालवत ते हे काम करत असतात. हे लिखाणाचे व्यसन लेखकाकडून उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती करवून घेते. झपाटल्यासारखा तो लिहित राहतो व राष्ट्रीय
एकात्मतेची निर्मिती करतो. असे राष्ट्र बांधणीचे
व्यसन प्रत्येकालाच असावे. लेखकाची लेखणी
क्रांती घडविते याची अनेक उदाहरणे इतिहासात
आहेत. ती स्फोटकही असते व राष्ट्रबांधणीही करते. वाचनाच्या व्यसनाने कित्येकांच्या आयुष्याचे सोने होऊन शेकडो ग्रंथांची निर्मिती
झाली आहे. सर्वात उत्तम व्यसन म्हणजे हे वाचनाचे व्यसन असून त्यातूनच शेकडो ग्रंथांची
निर्मिती झाली आहे. सर्वच उत्तम लेखक याचे
उत्तम उदा. आहेत.
आता..
“व्यासंग” म्हणजे काय ते पाहू..
व्यासंग म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयाचा किंवा
कलोपासनेचा गाढा, सखोल किंवा सातत्यपूर्ण
अभ्यास. यात केवळ वरवरची माहिती मिळवायची नसून त्या विषयाशी समरस होऊन,
एकनिष्ठ राहून मन एकाग्र करून परिश्रम करणे
अभिप्रेत आहे. लेखकाने त्या विषयात खोल संशोधन करून त्या विषयाच्या मुळाशी जाऊन
अभ्यास केला पाहिजे.एखाद्या विषयावर लिहायचे असेल तर त्या विषयाचे संदर्भग्रंथ,
पुराणे याचा समजूनउमजूनच अभ्यास करून
त्याची उकल त्याला करता आली पाहिजे. उदा.
थोर नाटककार, नाशिकचे सुपुत्र मा. वसंतराव
कानेटकर व थोर कवी व ज्ञानपीठ विजेते मा.
वि वा शिरवाडकर यांचे उदा. आपण घेऊ. वसंतरावांनी नाट्यक्षेत्र अफाट गाजवले. शिरवाडकरांची “विशाखा” ही कलाकृती त्यांना
ज्ञानपीठ देऊन गेली. तिच गोष्ट मा. वि स खांडेकर यांची. “ ययातीने” त्यांना ज्ञानपीठासह
खूप उंचीवर नेऊन ठेवले. अर्थात या लेखकांच्या
समग्र वाड्.मयाचा विचार यात केला जातो यात
शंका नाही. मी २/४ मोजकी उदाहरणे तुम्हाला दिली. पण देशभरात असे अनेक लेखक आहेत
ज्यांच्या व्यासंगाने आपल्याला थक्क व्हायला होते. व्यासंग काही फक्त साहित्य क्षेत्रातलाच
नसतो. तो अनेक क्षेत्राततला असू शकतो.
उदा. अत्यंत खडतर परिस्थितीत झाडे लावून
वनराई वाढविणे व जोपासणे एक प्रकारचा
व्यासंगच नाही का? शिल्पकलेचा व्यासंगही
आयुष्य पणाला लावतो, राम सुतारांसारखा.
शब्दकोश, विश्वकोश निर्मिती करणे किती
मोठ्या व्यासंगी लोकांचे काम आहे. येरागबाळ्याचे काम नाही ते. तरीही ही सर्व मंडळी आयुष्य पणाला लावून ही कामे केवळ
समाज व देशासाठी करत असतात यात मुळीच
शंका नाही. यात अनेक परदेशस्थ लेखक, लियो
टॅालस्टॅाय, दोस्तोव्हस्की यांच्यासारखे साहित्याला वाहून घेणारे लेखकही आहेत. साहित्यिकांची यादी केली तर ती फार मोठी
आहे. तर मंडळी, उत्तम गोष्टींचा व्यासंग असावा
व त्यासाठी आयुष्य पणाला लावायची तयारी
असावी. जिद्दी लोक ही तयारी ठेवतातच त्या
शिवाय का एवढे संशोधन होते व होत राहणार
आहे हे नक्की.
धन्यवाद मंडळी…
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
