You are currently viewing नाते -शब्दांच्या पलीकडचे
Oplus_16908288

नाते -शब्दांच्या पलीकडचे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम लेख*

 

*नाते -शब्दांच्या पलीकडचे*

 

नाती म्हटलं की अनेक चेहरे डोळ्यांसमोर येतात. नात्यांचे अनेक प्रकार असतात. काही नाती जन्माने मिळालेली असतात, तर काही नाती निस्वार्थ प्रेमाने निर्माण होतात. गुरु-शिष्य, शेजारी, सहप्रवासी, मित्र अशी नात्यांची अनेक रूपं आहेत. लग्नानंतर दोन कुटुंबांमध्ये नाती निर्माण होतात. नववधू कुणाची सून, कुणाची काकू, मामी, वहिनी होते. प्रत्येक नात्याला एक ओळख असते, एक नाव असते.

परंतु काही नाती अशी असतात की त्यांना कोणतेही नाव देता येत नाही. ते नाते असते निस्वार्थ प्रेमाचे, मनाचे आणि एकमेकांवरील विश्वासाचे!

अशी माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि नकळत आपल्या जगण्याचा, आपल्या आनंदाचा एक भाग बनून जातात. रोज बोलणं होत नाही, भेटणंही गरजेचं वाटत नाही; परंतु एका अनामिक ओढीने ती माणसं आपल्या जवळ आहेत, असं सतत जाणवत राहतं. त्यांच्या असण्याचा आनंदच एक वेगळी जीवनऊर्जा देतो. मनाच्या एका कोपऱ्यात त्यांचं स्थान कायमचं असतं.

एखाद्या शांत, उदास क्षणी किंवा आपण खूप आनंदात असताना अचानक त्यांची आठवण येते आणि जाणवतं—हे नातं खरंच शब्दांच्या पलीकडचं आहे.

या नात्यात कोणी कुणाकडून काही घ्यायचं नसतं, काही द्यायचंही नसतं. त्या व्यक्तीचं आपल्या हृदयात असणं, एवढंच आपल्यासाठी खूप असतं. त्यांच्या अस्तित्वाने मनाला आनंद आणि विश्वास मिळतो. जणू कुणीतरी हळूच सांगत असतं—“मैं हूँ ना!”

एवढासा दिलासाही मनाला शांत करण्यासाठी पुरेसा असतो.

अशा नात्यांना रोजच्या संवादाची गरज नसते. विश्वासाची एक निःशब्द वीण त्यांना एकमेकांशी जोडून ठेवते. आजच्या सोशल मीडियाच्या युगात तर अशी अनेक नाती अनुभवायला मिळतात. कधी एकमेकांना प्रत्यक्ष पाहिलेलंही नसतं, भेटणं झालेलं नसतं; पण तरीही मनं जुळलेली असतात. अशी नाती आनंद देणारी आणि मनाला आधार देणारी ठरतात. मात्र, अशी नाती जोडताना सुरक्षिततेची आणि योग्य मर्यादांची जाणीव ठेवणंही तितकंच आवश्यक आहे.

विशेषतः वृद्धांच्या आयुष्यात अशी मनाची नाती वाळवंटातील हिरवळ ठरतात. कोणताही स्वार्थ नसतो, देणं-घेणं काहीच नसतं. फक्त दोन प्रेमाचे शब्दही त्यांच्यासाठी पुरेसे असतात आणि त्या शब्दांतून मिळणारा आनंद त्यांचं मन प्रसन्न करून जातो.

रक्ताचं नातं आणि मनाचं नातं यात खूप फरक आहे.

रक्ताच्या नात्यांमध्ये अनेकदा अपेक्षा निर्माण होतात. सध्या तर ‘जर-तर’च्या चक्रव्यूहात बरीच नाती अडकलेली दिसतात. “मीच का हार मानायची?” ही प्रवृत्ती आधुनिक काळात अधिकच वाढलेली जाणवते. गैरसमज निर्माण झाले की, “आधी कोणी बोलायचं?” हा प्रश्न उभा राहतो. “मीच आधी का बोलू?”, “मीच का फोन करू?” या अहंकारात अनेक सुंदर नाती दुरावतात.

आजच्या काळात काही रक्ताची नातीही स्वार्थाच्या सावलीत अडकलेली दिसतात. पूर्वीसारखा जिव्हाळा, आपुलकी आणि निःस्वार्थ प्रेम कमी होत चालल्याची भावना अनेकांच्या मनात आहे. प्रत्येकजण आपल्या जगण्यात, आपल्या प्रश्नांत आणि आपल्या फायद्यात अधिक गुंतलेला दिसतो.

म्हणूनच, अशा स्वार्थीपणाने भरलेल्या नात्यांपेक्षा मनाने जोडलेली नाती मला अधिक जवळची वाटतात. याचा मी नेहमीच अनुभव घेते. मनाच्या नात्यांमध्ये “मीच आधी का बोलू?”, “मीच का फोन करू?” अशा अहंकाराला स्थान नसतं. तिथे असतो तो फक्त आपलेपणा, विश्वास आणि निःस्वार्थ प्रेम.

पण त्याचबरोबर एक सत्य विसरूनही चालणार नाही—रक्ताचं नातं तोडून तुटत नाही. काही नाती आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतात. त्यांच्यात मतभेद असतील, गैरसमज असतील, अपेक्षा असतील; तरीही त्या नात्यांचा मान राखणं ही आपली जबाबदारी आहे.

नातं कोणतंही असो—रक्ताचं किंवा मनाचं—ते जपण्यासाठी अहंकारापेक्षा प्रेम मोठं असावं, अपेक्षेपेक्षा समजूत मोठी असावी आणि “मी” पेक्षा “आपण” महत्त्वाचं असावं.

शेवटी नात्याला नाव आहे की नाही, यापेक्षा त्या नात्यामुळे आपल्या मनाला आनंद, विश्वास आणि जगण्याची उमेद मिळते का, हेच अधिक महत्त्वाचं.

काही नाती नावाने ओळखली जातात;

तर काही नाती मनाने अनुभवली जातात.

आणि म्हणूनच काही नाती खरंच असतात—

शब्दांच्या पलीकडची…!

 

 

प्रतिभा पिटके

अमरावती

९४२१८२८४१३

प्रतिक्रिया व्यक्त करा