You are currently viewing युवराज लखम राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना देवस्थान उप समित्यांच्या समस्यांबाबत निवेदन

युवराज लखम राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना देवस्थान उप समित्यांच्या समस्यांबाबत निवेदन

सावंतवाडी :

 

देवस्थान उप समित्यांना नवीन उपसमिती स्थापन करण्यासह समितीचा कारभार पाहताना अनेक अडचणी येतात. या जाचक अटीबाबत सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीने सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रशासक असलेले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री तेली तसेच देवस्थान समिती सहाय्यक सचिव श्रीम इंगवले यांची भेट घेऊन या समस्या सोडविण्यासह अनेक मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले. तसेच विविध मागण्यांच्या पूर्ततेबाबत त्वरीत कार्यवाहीची मागणी केली.

देवस्थानची नवीन उपसमिती स्थापन करताना येणाऱ्या अडचणी तसेच समितीचा कारभार पाहताना निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती. देवस्थान उपसमित्यांच्या समस्यांसह मागण्याबाबत सविस्तर निवेदन कोल्हापूर येथील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला देण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार हे निवेदन देण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी देवस्थान समित्यांच्या समस्यांसह मागण्यांबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीला दिले.

याबाबत सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीने कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला दिलेल्या निवेदनात, गावऱ्हाठीनुसार देवस्थान उपसल्लागार समिती नेमणुकीची ग्रामसभा मंदिरातच घेण्यात यावी. घाटमाथ्यावरील ग्रामदेवतेच्या मंदिरात ठराविक कार्यक्रम असतात. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरामध्ये वर्षभरात ३० ते ३५ कार्यक्रम असतात. त्यामुळे त्याप्रमाणे समित्यांची नेमणूक करावी. निवड समितीतील सदस्यांना पोलीस अधीक्षकांच्या चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची अट शिथिल करून पोलीस पाटील किंवा सरपंचांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरावे. काही मंदिरांची धर्मादाय आयुक्त व न्यास नोंदणी कार्यालयाकडे नोंद नसल्यामुळे पीटीआर उतारा मिळत नाही. तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान उप समितीकडे काही देवस्थानची नोंद नसल्याने समितीची नेमणूक होत नाही. त्यामुळे देवालयाच्या नोंदी आपल्या रजिस्टरला करून घ्याव्या. याबाबात लक्ष वेधण्यात आले.

तसेच काही मंदिरांचे मानकरी लगतच्या दुसऱ्या गावात दुसऱ्या गावात राहतात. त्यामुळे त्या मंदिरांची स्थानिक उपसमिती नेमण्याच्या ग्रामसभेत त्यांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी. देवस्थान उपसमित्यांना मार्गदर्शन मिळण्यासाठी सावंतवाडी कार्यालयात नियमित ऑफिसर इन्चार्जची नेमणूक करावी. तसेच गावात देवस्थान जमिनी ज्यांच्या नावे आहेत त्यांची नावे उप समितीला द्यावी. त्यानंतरच आपण आवाहन केल्याप्रमाणे खंड वसुलीसाठी व या जमिनीवरील बांधकामाबाबत उपसमिती सहकार्य करेल. उप समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची कामे व अधिकार निश्चित करण्याबाबत नियमावली तयार करावी. तसेच कोकणातील देवस्थानचे व उपसमित्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्या अधिपत्याखाली सावंतवाडीत उप समितीची नेमणूक करावी. या समस्यासह मागण्यांबाबत या निवेदनाद्वारे कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे लक्ष वेधण्यात आले.

यावेळी सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समिती अध्यक्ष एल एम सावंत, (कोलगाव), उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परब (आंबेगाव), सचिव राजाराम सावंत (बांदा), खजिनदार विलास गवस (वाफोली), सदस्य पंढरीनाथ पु राऊळ (सांगेली), नारायण राऊळ (शिरशिंगे), मधुकर देसाई (डेगवे), मंथन गवस (वाफोली), विलास सावंत (डिंगणे) आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा