You are currently viewing सावंतवाडीकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने मोठे पाऊल
Oplus_16908288

सावंतवाडीकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने मोठे पाऊल

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न अखेर मार्गी; राजघराण्याकडून जागा उपलब्ध – नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले

सावंतवाडी : सावंतवाडी येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न श्री देव पाटेकर आणि श्री देव उपलकर यांच्या आशीर्वादाने अखेर मार्गी लागला आहे. हा सावंतवाडी शहरासाठी अत्यंत ऐतिहासिक आणि महत्त्वाचा निर्णय ठरला असून, राजघराण्याने नेहमीच जनतेच्या हितासाठी काम केले आहे आणि यापुढेही ते अविरत सुरू राहील, अशी भावना सावंतवाडीच्या नगराध्यक्षा भोंसले यांनी व्यक्त केली.

याविषयी अधिक माहिती देताना नगराध्यक्षा भोंसले म्हणाल्या की, गेल्या अनेक वर्षांपासून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा विषय राजघराणे आणि शासन यांच्यामध्ये प्रलंबित होता. तो आज यशस्वीरीत्या सुटला आहे. सावंतवाडी राजघराण्याने जनतेच्या सेवेसाठी आणि शहराच्या विकासासाठी नेहमीच आपल्या जमिनी दिल्या आहेत. यापूर्वीही सार्वजनिक गार्डन, नगरपालिका कार्यालय, कॉलेज तसेच हॉस्पिटलच्या उभारणीसाठी राजघराण्याने मोठ्या प्रमाणावर जमिनी उपलब्ध करून दिल्याचा इतिहास आहे.

आज नगराध्यक्षा या नात्याने राजेसाहेब खेमसावंत भोंसले, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले आणि युवराज लखमराजे भोंसले यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, भाजप नेते रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांचे त्यांनी मनापासून आभार मानले.

सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक निर्णय घेणे शक्य झाले असून, राजघराणे सदैव जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा