नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष
सांगली / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) : जलसंधारणाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यात 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने मृद व जलसंधारण विभाग सांगली च्या वतीने ‘महावॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता होणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीतील वालचंद कॉलेजच्या पाठीमागील गेट (100 फूटी रोड) ते बापट मळा आणि पुन्हा वालचंद कॉलेजच्या पाठीमागील गेटपर्यंत महावॉकेथॉन होणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, स्वातंत्र्य दिनापासून प्रजासत्ताक दिनापर्यंत म्हणजेच 15 ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार २.०, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, अमृत सरोवर आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना यासारख्या उपक्रमांची माहिती या अभियानात जनतेपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी माती आणि पाण्याचे संवर्धन करणे ही सामूहिक जबाबदारी असून यामध्ये सक्रिय योगदान द्यावे. आणी सांगलीतील महावॉकेथॉनसह जलसंधारण सप्ताहातील विविध उपक्रमांमध्ये नागरिकांनी सामूहिक जबाबदारीने उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, या महावॉकेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना ऑनलाइन क्यूआर कोडद्वारे नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सहभागी नागरिकांना ई-प्रमाणपत्र तसेच ‘जलदूत’ म्हणून विशेष ओळख दिली जाणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम तीन विजेत्यांना आकर्षक पारितोषिके व गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय जलसंधारण मोहिमेशी डिजिटल माध्यमातून जोडण्यासाठी ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर चॅलेंज’ ही विशेष इंस्टाग्राम स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. १५ ते ३० वयोगटातील युवकांसाठी ही स्पर्धा असून, ‘सेव्ह सॉईल सेव्ह वॉटर’ या अधिकृत हॅशटॅगसह ३० ते ६० सेकंदांची रील तयार करून युवक या मोहिमेत सहभागी होऊ शकतात.
माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने राज्यात 15 ते 21 ऑगस्ट या कालावधीत ‘जलसंधारण सप्ताह’ सुरू आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून माती आणि पाणी वाचविण्याबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यभर विविध उपक्रम राबविले जात आहेत.
‘माती वाचवा-पाणी जपा आणि सुरक्षित भविष्य घडवा’ हा या संपूर्ण मोहिमेचा मुख्य संदेश आहे. हवामान बदलाच्या काळात पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व पटवून देणे, जलसंधारणाच्या उपाययोजनांमध्ये लोकसहभाग वाढविणे आणि मृद व जलसंधारणाबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून राज्यभर जलसंधारण सप्ताहाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. 21 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी महावॉकेथॉन आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या अधिकृत लोगोचे अनावरण मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
