*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नागपंचमी*
शुभ कार्याचा करु या
आज मंगल सोहळा
चैतन्याचा वाहु दे झरा
सण आजचा आगळा
नागपंचमीचा सण
सांगे कोकीळ गुंजन
रानातल्या वारुळाच
चला करु, गं पुजन
आला पंचमीचा सण
लेक बोलते मनात
धाड ना गं मुळं आई
सांगे वाऱ्याच्या कानात
माझ्या माहेराची वाट
नागमोडी वळणाची
भाऊराया मुळं येई
गाडी ढवळ्या पवळ्याची
आली माहेरवाशीण
भेटेमाय माऊलीला
सासरच्या गुजगोष्टी
सांगे सखी मैत्रीणीला
झोका रानात बांधला
भीडे उंच आभाळाला
नागोबाची गाणी गाई
निनादली आमराई
जमल्या माहेरवासिनी
गुंज सांगती कानात
सुखदुःखाच्या गोष्टींचा
सोहळा भरतो रानात
झिम्मा फुगडीची घाई
माहेरपणाची पुण्याई
श्रावण मासाचा महिना
हिरव्या रानाचीचं आई
सुख संपदा नांदू दे
माझ्या माहेरच्या घरी
सासरच्या अंगणात
आनंद तिन्ही प्रहरी
*शीला पाटील. चांदवड.*
