*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्वासातील श्रावण*
मेघांच्या काळ्या कुशीतुनी
श्रावण हळूच झुलतो
ओल्या मातीच्या गंधामधुनी
विरहाचा स्वर विरतो
थेंबांच्या मोत्यांची माळ घेऊन
नभ धरतीला सजविते
हिरव्या पानांच्या ओठांवरती पावसाची गाणी फुलविते
धुक्याची शाल पांघरुनी
डोंगर ध्यानात हरवतो
ओढा जणू चांदीचा सर्प
वळणावळणाने धावतो
विजेची चांदणी क्षणभर
नभाच्या कपाळी खुलते
गडगडणाऱ्या मेघांच्या तालावर धरती नर्तन करते
मोरपिसारा फुलवून मोर
आनंदाची तान छेडतो
वाऱ्याच्या रेशमी स्पर्शाने
वृक्ष हळूवार डोलतो
आईच्या मायेच्या पदरातून
बालपण पुन्हा हसते
कागदी होड्यांच्या स्वप्नांवरती आठवणींची सर बरसते
खिडकीवरचे थेंब अचानक
विरहाची अक्षरे लिहितात
डोळ्यांत दाटलेल्या भावनांना
पावसात अलगद मिसळतात
दुःखाच्या वाळवंटामध्ये आशेची पालवी फुटते
कोरड्या मनाच्या अंगणात
प्रेमाची रिमझिम झरते
ऋतू सरतात
मेघ विरतात पावसाची सर थांबते
पण माझ्या श्वासाश्वासांत श्रावणाची ओलच राहते
आभाळातला पाऊस थांबेल हिरवाईही कधीतरी विरून जाईल
पण हृदयातला हा श्रावण
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत बरसत राहील
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी– ठाणे@
9870451020
