विद्यार्थ्यांना सर्पसुरक्षेचे धडे; सर्पमित्रांकडून मार्गदर्शन*
कणकवली / तळेरे : वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,तळेरे येथे विद्यार्थ्यांमध्ये सर्पांविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सर्पांविषयी जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रशालेतील विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य तसेच सर्पमित्र व वनविभागाचे अधिकारी निलेश मोरये,विठ्ठल बिडये,वनरक्षक अमोल वटेकर, विजय भोसले,शुभम पाटील, वनविभाग प्रादेशिक फोंडाचे रिद्धेश तेली,राजू वायंगणकर, मयूर राणे,हरेश सावंत,सर्पमित्र मंदार राणे,सुदेश पाटील,राजेश डामरे,अमित इंदप,राजेश भोगले सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित सर्पमित्र व वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी प्राचार्यांनी सर्पमित्र व वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे सर्पसंवर्धन, जनजागृती आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने असलेले महत्त्वपूर्ण कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले.
यानंतर सर्पमित्रांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सापांविषयी सविस्तर व शास्त्रीय माहिती दिली. विषारी, निमविषारी व बिनविषारी सापांची ओळख, त्यांचे प्रकार, सापांचे पर्यावरणातील महत्त्व तसेच साप दिसल्यास कोणती काळजी घ्यावी,याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता तातडीने कोणती खबरदारी घ्यावी, कोणते प्रथमोपचार करावेत आणि कोणत्या चुकीच्या उपाययोजना टाळाव्यात, याबाबतही महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. प्रोजेक्टरवरील चित्रे व उदाहरणांच्या माध्यमातून केलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना सापांविषयीची माहिती अधिक प्रभावीपणे समजली.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील सापांविषयीच्या गैरसमजुती दूर होऊन सर्पांविषयी योग्य माहिती,सुरक्षिततेची जाणीव तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. शिक्षिका सुचिता सुर्वे यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशालेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
