You are currently viewing विशाल परब मित्रमंडळ व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा १४ ऑगस्ट रोजी

विशाल परब मित्रमंडळ व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा १४ ऑगस्ट रोजी

विशाल परब मित्रमंडळ व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा १४ ऑगस्ट रोजी

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त, सांघिकता आणि सांस्कृतिक मूल्यांची जोपासना करणारा अभिनव उपक्रम

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त, सांघिकता, सांस्कृतिक मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ व्हावी या उद्देशाने वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस व विशाल परब मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला तालुकास्तरीय शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता, वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला येथे पार पडणार असून, वेंगुर्ला तालुक्यातील सर्व प्रशालांमधील प्राथमिक (इयत्ता ५ वी ते ७ वी) व माध्यमिक (इयत्ता ८ वी ते १० वी) गटांतील विद्यार्थ्यांना सहभाग घेता येणार आहे.

आकर्षक रोख पारितोषिके

माध्यमिक गट (इ. ८ वी ते १० वी)

– प्रथम – ₹३,५००
– द्वितीय – ₹३,०००
– तृतीय – ₹२,५००
– चतुर्थ – ₹१,०००
– पाचवा – ₹१,०००

प्राथमिक गट (इ. ५ वी ते ७ वी)

– प्रथम – ₹२,५००
– द्वितीय – ₹२,०००
– तृतीय – ₹१,५००
– चतुर्थ – ₹१,०००
– पाचवा – ₹१,०००

सर्व विजेत्या संघांना रोख पारितोषिकांसह आकर्षक चषक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी प्रत्येक गटात प्रथम नावनोंदणी करणाऱ्या १० संघांनाच प्रवेश देण्यात येईल. प्रत्येक संघात किमान ६ व कमाल १५ विद्यार्थी असावेत. स्पर्धेत राष्ट्रभक्तीपर, प्रेरणादायी व संस्कारक्षम समूहगीत सादर करणे आवश्यक असून मराठी, हिंदी किंवा संस्कृत भाषेतील गीतांना मान्यता असेल. चित्रपट गीतांना प्राधान्य दिले जाणार नाही. प्रत्येक संघासाठी सादरीकरणाची कमाल वेळ ७ मिनिटे असेल.

समूहगीतासाठी संगीत साथ करणारे वादक संबंधित शाळेतील विद्यार्थी असणे आवश्यक आहे. मात्र, त्या शाळेत आवश्यक वादक उपलब्ध नसल्यास इयत्ता १० वीपर्यंत शिक्षण घेत असलेले इतर कोणत्याही शाळेतील विद्यार्थी संगीत साथीसाठी सहभागी होऊ शकतील. हार्मोनियम, तबला, ढोलकी, टाळ आदी मर्यादित वाद्यांना परवानगी असेल. रेकॉर्डेड ट्रॅक, ऑर्केस्ट्रा किंवा इतर इलेक्ट्रॉनिक संगीताचा वापर करण्यास सक्त मनाई राहील.

स्पर्धेतील सादरीकरणाचे मूल्यमापन सूर, ताल, शब्दांची स्पष्टता, अभिव्यक्ती, समन्वय, शिस्त आणि एकूण सादरीकरण या निकषांवर करण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्व स्पर्धकांना बंधनकारक राहील.

स्पर्धेसाठी दि. ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक असून, अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी डॉ. सचिन परुळकर (मो. ९४२१२३८०५३) यांच्याशी संपर्क साधावा.

वेंगुर्ला तालुक्यातील जास्तीत जास्त प्रशालांनी या शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस व विशाल परब मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा