मुंबई :
मुंबई _ दहावी,बारावी उत्तीर्ण आणि पदवीधर, उच्चशिक्षित या परिक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थी ,विद्यार्थ्यांनी यांची गुणवत्ता पाहता आमच्या मुलांचा सार्थ अभिमान वाटतो.त्यांनीं अधिकाधिक यश प्राप्त करताना वाचनाची सवय आत्मसात करावी असे मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ, मुंबई संस्थेचे विश्वस्त आणि समारंभ अध्यक्ष श्री. शंकर पोसम यांनी १०९ वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून भांडुप पश्चिम येथील कै. सहदेव लक्ष्मण शेलटकर सभागृहात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव प्रसंगी मार्गदर्शन प्रतिपादन केले. प्रारंभी प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर, माजी नायब तहसीलदार सौ. प्राची कांदळगावकर, दर्यावर्दी मासिकाचे संपादक अमोल सरताडेल, शंकर पोसम, गणेश बट्टा यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महिलांनी महाराष्ट्र गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. श्री. शंकर पोसम पुढे म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांनी समाजाच्या प्रवाहात येऊन या संस्थेशी संपर्क साधावा म्हणजे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करता येतील असे आश्वासीत केले. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर यांनी नमूद केले की, कै. दशरथ बट्टा, कै. आत्माराम कुबल, कै. दिलीप दादा शेलटकर आदींनी हा डोलारा उभा केला त्याला पुढे घेऊन जाण्याची कामगिरी विश्वस्त मंडळ करीत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देताना सामाजिक बांधिलकी जपत सदर संस्था कार्यरत आहे. त्यासाठी आपल्या सर्वांची एकत्रित साथ लाभल्यास अधिक जोमाने कार्य करणे शक्य होईल. यावेळी दर्यावर्दी मासिकाचे संपादक अमोल सरताडेल म्हणाले १०९ वर्षांची संस्था आजही तितक्याच ताकदीने चालवली जात असताना या सर्व पदाधिकाऱ्यांचा अभिमान वाटतो असे गौरवोद्गार काढले. या प्रसंगी यशस्वी विद्यार्थी, विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, बक्षीस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. छत्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका डॉ. वीणा संदिप शेलटकर खवळे यांनी डॉक्टर पदवी प्राप्त केल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर संस्थेच्या कामकाजात नेहमीच सहकार्य करणाऱ्या भगिनी सौ. वैशाली सरवणकर, सौ. हर्षा यशवंत चौगुले, सौ. शितल सुंदर मुणगेकर, सौ. मानसी विरेंद्र तांडेल यांना शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कुमार वैभव यांनी सुस्वर स्वरात गाणी गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पत्रकार श्रीविद्या सरवणकर, विषेश अतिथी म्हणून श्री.बाळा आंगणे, विश्वस्त केशव चोपडेकर, हरिश्चंद्र वस्त आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.रंगतदार सोहळ्यातचे सूत्रसंचालन डॉ. वीणा संदिप शेलटकर खवळे, सौ. हर्षा यशवंत चौगुले यांनी मौलिक शब्दात केले.
