“दोन महिन्यांत रस्ता उखडला; सार्वजनिक बांधकाम विभागाला अजित नाडकर्णी यांचा घेरावाचा इशारा”
देवगड–निपाणी–हैदराबाद मार्गावरील निकृष्ट कामाचा आरोप; ऑगस्टअखेरपर्यंत दुरुस्ती न झाल्यास आंदोलन, पालकमंत्र्यांनाही देणार निवेदन
कणकवली
देवगड–निपाणी–हैदराबाद या तीन राज्यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावरील रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी केला आहे. काम पूर्ण होऊन अवघ्या दोन महिन्यांतच रस्ता खराब झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
नाडकर्णी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसाळा तोंडावर असताना रस्त्याचे काम का करण्यात येत आहे, असा प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांना विचारला असता त्यांनी शासनाच्या जीआरचा आधार देत काम योग्य असल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संबंधित अधिकारी स्वतः कामाची पाहणी करत नसून ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचे काम करून घेतले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. देवगड–निपाणी–हैदराबाद हा तीन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
ऑगस्टअखेरपर्यंत संबंधित रस्ता योग्य पद्धतीने दुरुस्त करण्यात आला नाही, तर सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कणकवली कार्यालयावर घेराव घालण्यात येईल, असा इशारा अजित नाडकर्णी यांनी दिला आहे. तसेच याबाबतची लेखी नोटीस संबंधित विभागाला देण्यात येणार असून तिची प्रत पालकमंत्री नितेश राणे यांनाही पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
