You are currently viewing चेंदवण ग्रामपंचायतीत संजय गांधी निराधार योजना लाभार्थी मेळावा उत्साहात संपन्न

चेंदवण ग्रामपंचायतीत संजय गांधी निराधार योजना लाभार्थी मेळावा उत्साहात संपन्न

कुडाळ :

चेंदवण ग्रामपंचायत येथे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना तसेच इतर निराधार योजनांच्या लाभार्थ्यांसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याला लाभार्थी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या मेळाव्याच्या माध्यमातून निराधार व्यक्ती, दिव्यांग, अनाथ मुले तसेच गंभीर आजाराने ग्रस्त पुरुष व महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विविध योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना अर्ज प्रक्रियेबाबत सहाय्य करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी ग्रामपंचायतीने गावातील गरजू नागरिकांना आधार देण्यासाठी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. “ग्रामपंचायतीने समाजातील गरजू घटकांसाठी चांगले काम केले आहे. कार्यकर्त्यांनी याच जोमाने काम सुरू ठेवावे. भविष्यात जिल्हा परिषदेमार्फत आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जाईल,” असे सांगत त्यांनी पात्र नागरिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

मेळाव्यादरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात लाभार्थ्यांच्या नोंदीचा फलक लावण्यात आला होता. महिला व पुरुष लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध योजनांची माहिती घेतली आणि त्यांचा लाभ मिळविण्याबाबत मार्गदर्शन घेतले.

या उपक्रमामुळे गावातील गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळण्यास मदत होणार असून ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी उपसरपंच माधव, सदस्य नारायण शृंगारे, भूपेश चेंदवणकर, माजी सरपंच उत्तरा धुरी, तंटामुक्ती अध्यक्ष गौतम चेंदवणकर, सामाजिक कार्यकर्ते बाळू कोचरेकर, अण्णा भरडकर तसेच ग्रामस्थ आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा