You are currently viewing वा(ह)री जिवनाची अनमोल शिदोरी

वा(ह)री जिवनाची अनमोल शिदोरी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री मुख्याध्यापिका सीमा शास्त्री मोडक लिखित अप्रतिम लेख*

 

*वा(ह)री जिवनाची अनमोल शिदोरी*

 

“आई अगं मागच्या वर्षी तुला जमलं नाही निदान यावर्षी तरी प्रयत्न कर. शाळेचे काम तर तुला रिटायरमेंट पर्यंत आहेच, पण हा आनंद तुला आयुष्यभर मिळेल”. माझ्या डॉक्टर असलेल्या मुलीने, सायलीने मला यावर्षी सुद्धा वारीला येण्यासाठी खूप आग्रह केला.बहीण ज्योत्स्ना केळकर हिच्या नेतृत्वाने वारी ठरली.पती देवांची परवानगी आलीच होती. त्यामुळे मनाचा निश्चय केला आणि मुली बरोबर वारीला जाण्याचे ठरवले. अगदी त्याचवेळी माझ्या मोठ्या ताईला ही मी फोन करून आवर्जून विचारले. संसाराच्या गराड्यात गुरफटून गेलेली माझी ताई यायला तयार झाली.

मनात आनंद गगनात मावेना. आई-वडील नाही तर निदान मोठी ताई आपल्याबरोबर वारीला येत आहे याचा आनंद, समाधान होतं.

वारीला जायचं म्हणजे सोबत काय घ्यायचं काय नाही अशी खूप मोठी लिस्ट केली. पण मुलीने तेव्हाच सांगितलं” आपण वारीला जाततय कुठल्या रिसॉर्टमध्ये नाही त्यामुळे जितकं कमी सामान घेता येईल तितकं: कमी सामान घ्या आणि वारीला जायचं म्हणजे आपल्या गरजा किती कमी आहेत हे आपल्याला कळतात”. खरंच जितकं सामान कमी करता येईल तितकं केलं आणि त्याच क्षणी वारीने पहिली शिकवण दिली ती म्हणजे माणसाच्या गरजा खूप कमी असतात. पण आपणच त्या चैनीत त्या ऐशोआरामात स्वतःला कुठेतरी गुरफटून घेता.

दोन बॅगच्या ऐवजी एकच बॅग झाली आणि लक्षात आलं की खरंच वारीने वारीला जायच्या आधीच शिकवलं की आपण कमीत कमी गरजांमध्ये सुद्धा खूप आनंदात राहू शकतो आणि शरीरावरचा आणि मनावरचं वजन कमी झालं. सुरुवातीला आम्ही श्री क्षेत्र गोंदावले येथे गेलो. महाराजांचे ते रूप पाहून उत्साह ,चैतन्य अंगात सळसळला. कितीही वेळा दर्शन घेतलं तरी डोळ्यांचे पारणे फिटतच नव्हते.रात्री मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आमच्या परीने सेवा दिली; सेवा नाही दिली तर आम्ही सेवेचा आनंद मिळवला समाधान मिळवले. वारीत फक्त सगळं मिळतच गेलं.वारीत प्रत्येक ठिकाणी, जागोजागी देणारे दाते भरभरून देत होते. माऊली घ्या म्हणून आग्रहाने अन्नदान करत होते. यातून शिकायला मिळाला की आपण जे कमावतो त्यातला काही भाग का असेना आपण दान करायलाच हवा. दातृत्वाबरोबर वारीतून नेतृत्व ही शिकायला मिळालं. कारण प्रत्येक वारीत प्रत्येक दिंडीचे प्रमुख आपापल्या वारकऱ्यांना अतिशय शिस्तीत दिंडीत चालायला सांगत होते. पण त्याचबरोबर प्रत्येक वारकरी इतर वारकऱ्यांची काळजी घेत होते. एका ठिकाणी आमच्याकडे ताट वाटी गाडीतच राहिले पण पांडुरंगाच्या रूपात एक सद्गृहस्थ आले आणि त्यांनी त्यांचे ताट वाटी आम्हाला दिल्यामुळे महाप्रसादाचा लाभ झाला.

एक ना अनेक ठिकाणी वारीमध्ये पांडुरंगाने आम्हाला प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या दर्शन दिले. चालून चालून एक वेळ अशी आली की पाय दुखायला लागले. विठ्ठलाला आळवलं” विठ्ठला तुझ्या दर्शनाला यायचं आहे आणि काय सांगावं काही वेळातच पाय दुखणे बंद झालं”. रोज ‘ फिरून झाल्यानंतर रात्री विठ्ठला माझ्या पायाची काळजी तूच घे रे बाबा कारण उद्या पुन्हा चालायचं आहे हे सांगितल्यानंतर खरोखर त्या पांडुरंगानेही ऐकलं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी आम्ही वारीसाठी सज्ज झालो.

आमचा संपूर्ण ग्रुप लॉजवर राहत होतो. पण काही वारकरी रस्त्यांवर, शाळेत जागा मिळेल तिथे विसावा घेत होते आणि पायी चालत होते त्यांना मिळणारी ही शक्ती, ही ताकद पांडुरंगाची ओढच त्यांना देत होती. खरोखर जेव्हा पांडुरंगाच्या पंढरीत आम्ही पोहोचलो तो स्वर्गीय आनंद काय असतो त्याचा सुखद अनुभव घेतला. साखर किती गोड असते हे जसं खाल्ल्याशिवाय कळत नाही, तसंच वारी केल्याशिवाय वारीचा आनंद कळत नाही. माऊली सगळ्यांना सांगेन की जीवनात एकदा का असेना तुम्ही ही वारी कराच. एक दिवस दोन दिवस शक्य असेल तितक्या दिवसांची वारीत करावीच. कारण वारीत आपण कोण आहोत, कोणत्या पदावर आहोत, आपण गरीब आहोत की श्रीमंत आहोत हा सगळा भेदभाव तिथे निघूनच जातो. आणि एक वारकरी म्हणून जेव्हा आपण वारीत सहभागी होतो तेव्हा खरोखर श जीवनातली एक अविस्मरणीय शिदोरी आपल्याला मिळते.

आपल्या गरजा किती आपण किमान ठेवू शकतो हेही लक्षात येते. काही वेळेस असंही झालं की वारीला जाताना मोबाईल फोन मध्ये रेंज नव्हता पण नंतर लक्षात आलं की ज्यावेळी आपण पांडुरंगाच्या रेंजमध्ये असतो त्यावेळी आपल्याला इतर रेंजमध्ये जाण्याची गरजच भासत नाही. अहो पांडुरंगाच्या रेंजमध्ये आहे त्याला कुणाची भीती? त्याच्या हृदयात असतो तो फक्त पांडुरंग. वारीत चालता चालता आपण कधी त्याच्या सावळ्या रंगाचे होतो हेही लक्षात येत नाही आणि मग असं वाटायला लागतं की खरोखर त्याच्या रंगाशी आपण एकरुप झालो आहोत.

वारीत प्रत्येक वारकरी एकमेकांना माऊली म्हणतो त्यामुळे प्रत्येकाच्या मनात एक दुसऱ्यांबद्दल आदर निर्माण होतं. हाच आदर जीवनात प्रत्येकाच्या बाबतीत असावा हेही वारीत शिकायला मिळालं. समायोजन करण्याची कला वारीत नक्कीच शिकायला मिळते. जेवताना खाली बसून जेवलो म्हणजे प्रत्येकालाच पांडुरंग जमिनीवर राहण्याची बुद्धी देतो. अशा या वारीमध्ये जीवनातील प्रत्येक शिकवण आपल्याला मिळते. म्हणून माऊली मी तर नक्कीच म्हणेन,

एकदा तरी,

आयुष्यात करावी.

अहंपणा गळूनीया गेला,

जीवनाचा अर्थ कळाला.

मी, माझे पण हरवून गेले,

पांडुरंगे नयनी अंजन घातले.

काय म्हणशील हे माझे, आजी उमगले सारेच तुझे.

 

सौ.सीमा शास्त्री मोडक मुख्याध्यापक

डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल नंदुरबार

प्रतिक्रिया व्यक्त करा