सरकारने दहीहंडीला साहसी खेळ म्हणून दर्जा दिलेला आहे. त्यामुळे दहीहंडी हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होतो. हा उत्सव त्यापूर्वीही जल्लोषात साजरा व्हायचा. लोक रस्त्यावर लहान मुलांना खांद्यावर बसवून ही दहीहंडी दाखवायचे. काका, मामा, बाबा यांच्या पालखीच्या खांद्यावर बसून लहान मुलं अगदी आवडीने हा उत्सव बघायचे. सर्व घरातल्या माता भगिनी या गर्दीत सामील झालेल्या असायच्या, त्या स्वतः या गोविंदांवर पाणी टाकायच्या इमारतींमधून आपल्याला मुंबईचं हे दृश्य कायम दिसायचं.
आज मात्र या दहीहंडी उत्सवाचं चित्र विचित्र झालं आहे.
पूर्वी एखादा अभिनेता, अभिनेत्री हे यायचे आणि त्यांचे फिल्मी गाणे थोड्याबहुत प्रमाणात वाजायचे, त्यावर हे कलाकार दोन-तीन मिनिटं डान्स करायचे. त्या काळात कलाकारांचं कला सादरीकरण नसायचं फक्त लोकांचा जल्लोष वाढवण्याकरता हे अभिनेते, अभिनेत्री दहीहंडी उत्सवात सामील होत होते. त्यावेळी कदाचित गोविंदा , चंकी पांडे, मिथुन, अनिल कपूर किंवा काही मोजक्या अभिनेत्री यायच्या. सध्याच्या काळात मात्र दहीहंडी उत्सवाचे बाजारीकरण झाले आहे, अनेक नृत्य करणाऱ्या अभिनेत्री नसलेल्या, कलाकार स्त्रिया या कार्यक्रमात येतात. त्यांच्याकडे प्रॉपर तमाशाचा फड असतो का? हाच खरा प्रश्न आहे. पूर्वी गावच्या जत्रेत तमाशा कलावंत यायचे, त्यावेळी त्यांचे मजबूत लोकप्रिय फड असायचे. त्यावेळी ते कलाकार पारंपारिक गण, गवळण, वघ लावणी, बतावणी सवाल जवाब हे लोककला प्रकार करायचे. सर्व काही सुंदर पद्धतीने सादर केले जायचे.
तमाशामधली लावणी हा प्रकार खरंतर प्रियकर – प्रेयसी मधल्या किंवा पती-पत्नी मधल्या प्रेममय नात्याचा कलापूर्ण अविष्कार असायचा, तसा तो पारंपरिक कलाप्रकार आहे. हा त्या दोन नात्यांमधला शृंगारिक प्रकार आहे. म्हणून लावणी स्त्रीला व पुरुषाला आवडते. त्याचे हे एकमेव कारण आहे. बाकी तमाशा हा प्रकार कौटुंबिक स्त्रियांना अजिबात आवडत नाही, हे सामाजिक चित्र आहे. ते चित्र पूर्वीच्या काळीच्या तमाशाप्रधान चित्रपटामुळे झालं. असंही काही जाणकार आपल्याला सांगतात. त्या काळात खऱ्या अर्थाने तमाशा आणि लावणीचं बाजारीकरण झालं. म्हणून कौटुंबिक माता-भगिनींना तमाशा आवडत नाही.
या सामाजिक नैतिकतेला डावलून काही दहीहंडी वाले आयोजक उगाचच तरुणांना आणि प्रौढांना चाळवण्यासाठी अशा नृत्य करणाऱ्या स्त्रियांना आणतात. त्यांना कलाकार म्हणावे का हा सुद्धा प्रश्न पडतो. कारण त्या लावणी हा नृत्य प्रकार बाजूला ठेवून भलत्या पद्धतीने नाचतात. ज्याप्रमाणे चित्रपटात एक कथानकाची बाजू म्हणून बार किंवा बारबाला दाखवल्या जातात. त्यांचा डान्स ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे या तरुण मुली व्यासपीठावर नाचतात. नऊवारी साडी नेसली म्हणून त्या पूर्ण लावणी कलाकार होत नाहीत असे आता म्हणावे लागते. त्यामुळे पाहणाऱ्या कौटुंबिक मंडळींना हा दहीहंडी उत्सव चित्रविचित्र नृत्याचा खेळ वाटतो. इथे येणारे सर्व लोक दहीहंडी थर वर थर चढवणाऱ्या मुलांना बघण्यासाठी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी येतात आणि त्यांना हे नकोसे नाट्य बघावे लागते. ही आपल्या हिंदू सण उत्सवाची शोकांतिका आहे असे मला वाटते. हे प्रकार आता कुठेतरी बंद झाले पाहिजेत सरकारने या गोष्टीवर बंदी आणली पाहिजे. हे आयोजक कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत. हे न बघता सरसकट सरकारने सर्व आयोजकांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत तर पुढील काळात असे प्रकार होणार नाहीत.
मित्रांनो श्रीकृष्णाच्या काळात मथुरेत कंसाच्या राजकारणामुळे तिथल्या लहान मुलांना दूध, दही खायला मिळायचे नाही. त्यांच्या घरात मात्र हे पदार्थ केले जायचे,
मग ते मथुरेच्या बाजारी विकले जायचे. कंसाच्या स्वार्थी राजवटी करता. हे सर्व लक्षात घेऊन श्रीकृष्णाने बालपणी असे ठरवले की, आपण दोन-तीन थर रचन घराच्या कवलावर आतून टांगलेल्या घागरीला फोडले की, या मुलांना दही, दूध, लोणी खाता येईल. म्हणून कृष्ण हा बाल कल्याणासाठी अशी दहीहंडी करायचा. या कार्यातून श्रीकृष्णाने जनशक्ती एकत्र जमा केली आणि कंसाच्या अत्याचाराचा मुकाबला केला. असं करताना एक दिवस कंसाला ठार मारले, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आज आशा आयोजक रुपी कंसाला आपण धडा शिकवला पाहिजे तरच असे उत्सवाचे विचित्र आयोजन बंद होतील. त्यातून बाळगोपाळांच्या दहीहंडीला चांगले स्वरूप येईल असा हा मंगलदायी सण उत्सव आपल्याला हवा आहे.
एडवो. रुपेश पवार
9930852165
