‘सभापती आपल्या दारी’ उपक्रमाला दोडामार्गात उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांच्या समस्या गावातच सोडविण्याचा प्रयत्न
उपसभापती गणेशप्रसाद गवस यांची अभिनव संकल्पना; माटणेनंतर मणेरी मतदारसंघातही उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी
दोडामार्ग :
दोडामार्ग पंचायत समितीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘सभापती आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाला तालुकाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नागरिकांच्या समस्या थेट त्यांच्या गावात जाऊन ऐकून त्यांचे तत्काळ निराकरण करण्याच्या प्रयत्नामुळे उपक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
दोडामार्ग पंचायत समितीचे उपसभापती गणेशप्रसाद गवस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचा उद्देश प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करून शासनाच्या सेवा गावपातळीवर प्रभावीपणे पोहोचविणे हा आहे. याअंतर्गत पंचायत समितीचे पदाधिकारी, अधिकारी आणि संबंधित विभागांचे प्रतिनिधी गावात जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेत असून, शक्य त्या समस्यांचे ‘ऑन द स्पॉट’ निराकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या उपक्रमाचा पहिला टप्पा माटणे जिल्हा परिषद मतदारसंघात यशस्वी झाल्यानंतर आज मणेरी जिल्हा परिषद मतदारसंघात हा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध समस्या मांडल्या.
यावेळी पंचायत समितीच्या सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस, गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, जिल्हा परिषद सदस्या साक्षी तळवडेकर, पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, सोनिया नाईक, स्नेहा गवस, सायली निंबाळकर, मणेरीच्या सरपंच सौ. कांबळे यांच्यासह मणेरी जिल्हा परिषद मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रशासक, विविध बचत गटांच्या महिला तसेच पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात नागरिकांनी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज, शासकीय योजनांचा लाभ, विविध दाखले, विकासकामे तसेच ग्रामपातळीवरील अन्य प्रश्न मांडले. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी अनेक समस्यांवर तत्काळ कार्यवाही करत मार्गदर्शन केले, तर काही प्रकरणांमध्ये आवश्यक सूचना देत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
या उपक्रमामुळे नागरिकांना पंचायत समिती कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज कमी होत असून, प्रशासन थेट गावात येऊन समस्या ऐकत असल्याने उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. पंचायत समितीच्या सर्व जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये हा उपक्रम टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
