स्व. अजितदादांच्या जयंतीनिमित्त अजित नाडकर्णी यांनी जागवल्या भावनिक आठवणी
‘असा नेता पुन्हा होणे नाही’; कुर्ली धरणावरील भेटीपासून मंत्रालयातील कार्यशैलीपर्यंत आठवणींना उजाळा
कणकवली
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत स्व. अजितदादांच्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी स्व. अजितदादांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
अजित नाडकर्णी यांनी सांगितले की, २००७ साली तत्कालीन नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासोबत कामानिमित्त मुंबईला गेलो असताना स्व. अजितदादांच्या निवासस्थानी भेट देण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी त्यांच्या आवडीचे ओले काजूगर भेट म्हणून नेले होते. सकाळी सातच्या सुमारास झालेल्या या भेटीत अजितदादांनी मिश्कील शैलीत, “संदेश, ओले काजूगर सुनेत्राकडे दिलेस तरी सर्व फाईल पाहूनच सही करणार, वशिला चालणार नाही,” असे म्हणत तत्काळ फाईलवरील निर्णय घेतला होता. त्यांच्या या स्पष्टवक्तेपणा आणि कार्यपद्धतीचा आजही ठसा मनावर असल्याचे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, स्व. अजितदादा दररोज सकाळी साडेसहा वाजता कार्यालयात उपस्थित असत. मंत्रालयात एखादा कार्यकर्ता दिसला तर त्याच्यासोबत जेवण किंवा नाश्ता करण्याचा त्यांचा साधेपणा सर्वांना आपलेसे करणारा होता. कुर्ली धरणावरील एका कार्यक्रमात त्यांनी माझ्याकडून हार स्वीकारला होता. त्या क्षणाची आठवण आजही कायम मनात आहे.
“आज अजितदादा आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्याचा आणि साधेपणाचा आदर्श कायम प्रेरणादायी राहील. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,” अशा भावना अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केल्या.
