जागतिक शांतता, आरोग्य व समृद्धीसाठी विठ्ठल-रुक्मिणी चरणी राजू मसूरकर यांची प्रार्थना
सावंतवाडीतील सप्ताह सोहळ्यात दर्शन घेऊन युद्धजन्य परिस्थिती संपुष्टात यावी, सर्वांना सुख-शांती लाभावी, अशी केली ईश्वरचरणी प्रार्थना
सावंतवाडी
सावंतवाडी शहरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गुरुवारपासून सुरू झालेल्या सप्ताह सोहळ्यानिमित्त जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी मंदिरात जाऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जगातील सर्व नागरिकांच्या सुख, शांती, आरोग्य, दीर्घायुष्य, धनसंपत्ती, ऐश्वर्य तसेच उद्योग-व्यवसाय आणि नोकरीत भरभराट व्हावी, अशी भक्तिभावाने प्रार्थना केली.
यावेळी बोलताना मसूरकर यांनी सध्या जगातील विविध देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. युक्रेन, रशिया, इजराइल, इराण तसेच इतर देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, युद्धाचा अंत व्हावा आणि सर्व राष्ट्रांच्या प्रमुखांना योग्य निर्णय घेण्याची सद्बुद्धी मिळावी, अशी प्रार्थना त्यांनी विठ्ठल-रुक्मिणी चरणी केली.
जगभरातील नागरिकांनी आपल्या देशात सुरक्षित, आनंदी आणि समृद्ध जीवन जगावे, प्रत्येकाला रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच संपूर्ण जगात शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश रुजावा, अशीही प्रार्थना राजू मसूरकर यांनी यावेळी केली.
