You are currently viewing पहिला पाऊस पडला की…

पहिला पाऊस पडला की…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*पहिला पाऊस पडला की*…

 

पहिला पाऊस पडला की

येते मला तुझी आठवण

कोरड्या मनाच्या माळरानावर

तुझ्या स्मिताची पहिली सर

 

ओल्या मातीचा दरवळ

आजही तुझ्याच स्पर्शाचा भास देतो

वाऱ्याची प्रत्येक हळवी झुळूक

तुझे न उच्चारलेले शब्द घेऊन येतो

 

खिडकीवर अलगद थबकलेले थेंब

तुझ्या डोळ्यांतल्या स्वप्नांसारखे वाटतात

त्यांना स्पर्श करावा म्हणेपर्यंत

ते शांतपणे विरघळून जातात.

 

आभाळ भरून येते तेव्हा

माझेही मन नकळत ढगाळून जाते

कारण..

प्रत्येक पावसात

एक विरह दडलेला असतो आणि

प्रत्येक विरहात

तुझेच नाव उमलत असते.

 

त्या ओल्या पायवाटांवर

आपली पावले आता नसली तरी आठवणींची फुले

आजही तिथेच उमलत असतात

 

पाऊस थांबतो…

ढग दूर निघून जातात…

मात्र तुझी आठवण

क्षितिजावरच्या इंद्रधनुष्यासारखी

मनात बराच वेळ रेंगाळत राहते.

 

ऋतू बदलले

वर्षेही सरून गेली

पण पहिल्या पावसाचा

तो पहिला थेंब अजूनही

तुझ्या नावानेच माझ्या हृदयात पडतो

 

कारण…

पहिला पाऊस हा फक्त आकाशातून बरसत नाही

तो जुन्या प्रेमाच्या पानांवर

जपलेल्या आठवणींच्या अक्षरांवर

आणि न बोललेल्या भावनांच्या शांत मंदिरात

हळुवार बरसत राहतो….

 

लेखिका/ कवयित्री

संगीता कुलकर्णी– ठाणे@

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा