मांगेली-फणसवाडी घाटात मोठी दरड कोसळली; खोक्रल-मांगेली मार्ग काही तास ठप्प
मुसळधार पावसाचा फटका; जेसीबीच्या सहाय्याने माती, दगड व झाडांचा ढिगारा हटवून दुपारनंतर वाहतूक पूर्ववत
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यात गुरुवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध पर्यटनस्थळ मांगेली-फणसवाडी घाटात मोठी दरड कोसळल्याची घटना घडली. खोक्रल ते मांगेली या महत्त्वाच्या घाट रस्त्यावर डोंगराचा मोठा भाग खचून माती, दगड आणि झाडांचा मोठा ढिगारा रस्त्यावर आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने जेसीबीच्या सहाय्याने रस्ता साफ करून दुपारपर्यंत वाहतूक सुरळीत केली.
गुरुवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात पाणी झिरपल्याने ही दरड कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरड कोसळताना मोठ्या प्रमाणात लाल माती, दगड आणि झाडे रस्त्यावर आल्याने काही क्षणांतच संपूर्ण मार्ग बंद झाला. सुदैवाने, दरड कोसळली त्यावेळी त्या ठिकाणावरून कोणतेही वाहन जात नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
दरड कोसळल्यामुळे मांगेली येथून परतणारी एसटी बस तसेच अनेक दुचाकी व चारचाकी वाहने दोन्ही बाजूंना अडकून पडली. पर्यायी मार्ग नसल्याने प्रवाशांना तासन्तास रस्ता मोकळा होण्याची प्रतीक्षा करावी लागली.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस आणि खोक्रलचे सरपंच देवेंद्र शेटकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यांनी तहसीलदार राहुल गुरव तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपकार्यकारी अभियंता सीमा गोवेकर यांच्याशी संपर्क साधून रस्ता तातडीने खुला करण्याची मागणी केली.
संजय सातार्डेकर, समीर रेडकर, अजित नाईक, गोविंद गवस, प्रकाश गवस, सरपंच मॅडम, तसेच सर्वमांगेली ग्रामस्थ यावेळी घटनास्थळी होते.
प्रशासनाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जेसीबी मशीन घटनास्थळी रवाना केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने माती, दगड आणि झाडांचा ढिगारा हटवून दुपारनंतर रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला केला. त्यामुळे अडकलेल्या प्रवाशांनी आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
