You are currently viewing भातलावणीत उतरल्या जि.प. सदस्या सुप्रिया मेस्त्री

भातलावणीत उतरल्या जि.प. सदस्या सुप्रिया मेस्त्री

भातलावणीत उतरल्या जि.प. सदस्या सुप्रिया मेस्त्री; महिला शेतकऱ्यांसोबत केले श्रमदान

कासरल येथे साई महिला ग्रामसंघ व मैत्री एकात्मिक शेती ग्रुपचा उपक्रम; सेंद्रिय शेतीसाठी जीवामृत प्रात्यक्षिकातून जनजागृती

कणकवली :

कासरल येथील साई महिला ग्रामसंघ आणि मैत्री एकात्मिक शेती ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भातशेतीतील काढणी व भातलावणीचा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात कलमठ गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया संदीप मेस्त्री यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून महिला शेतकऱ्यांसोबत श्रमदान करत त्यांचा उत्साह द्विगुणित केला.

यावेळी सरपंच स्नेहा परब, प्रभाग समन्वयक विठ्ठल परब, कृषी सहाय्यक तेली मॅडम, सीआरपी श्रद्धा बागवे, पाणी फाउंडेशनचे मनीष पेडणेकर, ग्रामसंघ सचिव प्रज्ञा सावंत, कोषाध्यक्ष पायल परब तसेच आशा सेविका मीनल सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपक्रमादरम्यान सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी जीवामृत तयार करण्याचे व त्याचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करण्यासाठी महिला शेतकऱ्यांमध्ये यावेळी जनजागृती करण्यात आली.

यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री म्हणाल्या, “महिला शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढावा, तसेच शेतीमध्ये आधुनिक आणि सेंद्रिय तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हावा, या उद्देशाने आम्ही प्रत्यक्ष शेतात उतरून या उपक्रमात सहभागी झालो आहोत. महिलांनी सामूहिक शेतीच्या माध्यमातून स्वावलंबनाचा आदर्श निर्माण करावा.”

या उपक्रमामुळे महिला बचतगटांमध्ये एकात्मिक शेती, सेंद्रिय शेती आणि सामूहिक श्रमसंस्कृतीचा सकारात्मक संदेश पोहोचला असून, सुप्रिया मेस्त्री यांच्या प्रत्यक्ष सहभागाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा