You are currently viewing लॉक्ड मोबाईल करणार हत्याकांडाचं प्रकरण अनलॉक?

लॉक्ड मोबाईल करणार हत्याकांडाचं प्रकरण अनलॉक?

 

‘यशस्विनी महिला ब्रिगेड’च्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठेच्या अडचणी आता आणखी वाढणार असून बुधवारी बाळ बोठेचा अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळला. तर आज बाळ बोठेच्या घरातून पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला. आता हा मोबाईलच बोठेने कशाप्रकारे गुन्हा केला आणि रेखा जरे, सागर भिंगारदिवेशी त्याचं काय बोलणं होत होतं, याबाबतचा उलगडा करण्याची शक्यता आहे.

बाळ बोठेच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलला लॉक आहे. डबल सिक्युरिटी फिचर असणारं लॉक या मोबाईलला असल्यामुळे लॉक उघडण्याचा प्रयत्न केला तर सगळा डेटा डिलीट होण्याची भीती पोलिसांना आहे. त्यामुळे पोलीस आता मोबाईल एक्स्पर्टची मदत घेत आहेत. हा मोबाईल बाळ बोठेच उघडू शकतो, असं सध्यातरी दिसतं. मात्र, मोबाईल एक्स्पर्टने काही कमाल केली तर बाळ बोठेच्या मोबाईलसोबत हे प्रकरणही अनलॉक होऊ शकतं.

बाळ बोठेचा मोबाईल अनलॉक झालाच, तर त्यात बाळ बोठेने कुणाकुणाशी सोशल मीडिया वा व्हॉट्सअपवर चॅट केलं आहे. त्यात बाळ बोठे काय सांगतो आहे. रेखा जरेशी बाळ बोठे व्हॉट्सअपवर बोलला आहे का? आणि बोलला असेल तर त्यात काय आहे? याशिवाय सागर भिंगारदिवेला बाळ बोठेने काय काय सांगितलंय, हेही समोर येऊ शकतं. याशिवाय, बाळ बोठेच्या मोबाईलचं ऑटो कॉल रेकॉर्डिंग सुरु असेल तर तो रेखा जरेशी काय बोलत होता? सागर भिंगारदिवेला त्यानं काय सांगितलं? त्यांच्यामध्ये काय काय संभाषण झालं? हेही समोर येऊ शकतं.

बाळ बोठेच्या मोबाईलमध्ये काही चॅट्स वा रेकॉर्डिग सापडलं तर पोलीस ते पुरावा म्हणून कोर्टात सादर करु शकतात. शिवाय बाळ बोठेला गजाआड केल्यानंतर त्यानं गुन्हा कसा केला, हे जाणून घेण्यासाठी पोलीस या सगळ्याचा वापर करु शकतात. बाळ बोठे कुठल्या वेळी कुठं होता, हे त्याच्या जीपीएस लोकेशनवरुनही कळू शकतं. आणि या सगळ्याचा वापर गुन्हा निश्चित करण्यासाठी होऊ शकतो.

बाळ बोठेच्या मोबाईलमधून अनेक गोष्टीचा उलगडा होऊ शकतो. रेखा जरे हत्याकांडात अजून दुसरं कुणी सहभागी नाही ना? बाळ बोठेला पळून जाण्यास कुणी मदत केली? आणि पोलिसांचा छापा पडण्याआधीच त्याला सगळी माहिती कोण पुरवतं? याचाही उलगडा हा मोबाईल करु शकतो. शिवाय पैशाच्या व्यवहाराचीही सगळी माहिती या मोबाईलमधून मिळू शकते.

एकूणच बाळ बोठेचा पोलिसांना सापडेलेला मोबाईल लॉक असला तरी तो हे प्रकरण अनलॉक करण्यासाठी महत्त्वाचं शस्र बनू शकतो. त्याआधारे सगळं प्रकरण कशाप्रकारे घडलं, हनीट्रॅप सीरिजचा यामध्ये काही सहभाग नाही ना? आणि बाळ बोठेला फसवण्यात आलंय की तोच या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे हेही जगासमोर येईल. त्यामुळं आता हा मोबाईल अनलॉक होणं अत्यंत गरजेचं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा