You are currently viewing दोडामार्ग येथील वीज ग्राहकांच्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

दोडामार्ग येथील वीज ग्राहकांच्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

*जिल्हा वीज ग्राहक संघटना व व्यापारी संघ दोडामार्गचे आयोजन*

 

दोडामार्ग: (प्रतिनिधी)

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना व दोडामार्ग तालुका व्यापारी संघ आयोजित वीज ग्राहकांची बैठक शनिवार दिनांक १३ जानेवारी रोजी दोडामार्ग बाजारपेठेतील पिंपळेश्वर हॉलमध्ये पार पडली. या बैठकीत जिल्हा वीज ग्राहक संघटना पदाधिकाऱ्यांनी दोडामार्ग तालुक्यातील वीज ग्राहकांना भेडसावणारे प्रश्न जाणून घेत त्यावर सविस्तर चर्चा करून दोडामार्ग तालुका वीज ग्राहक संघटना स्थापनेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत शुक्रवार दिनांक १९ जानेवारीच्या बैठकीत तालुका कार्यकारिणी गठित करून महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेण्याचे ठरविण्यात आले. यावेळी जिल्हा वीज ग्राहक संघटना उपाध्यक्ष दीपक पटेकर, जिल्हा सचिव निखिल नाईक, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संजय गावडे, सावंतवाडी तालुका सचिव संजय नाईक, सदस्य समीर शिंदे, दोडामार्ग माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, व्यापारी संघाचे सागर शिरसाट, संजय गवस, ज्ञानेश्वर उर्फ बंटी मोरजकर आदी पदाधिकारी व वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोडामार्ग येथे आयोजित बैठकीत जिल्हा सचिव निखिल नाईक यांनी संघटना स्थापनेचे उद्दिष्ट विशद केले. त्यानंतर वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेत संघटना स्थापण्याची गरज का आहे याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील वीज ग्राहकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला जात असून त्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यात कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. दोडामार्ग येथील बैठकीत वीज ग्राहक संघटनेत स्वखुशीने काम करणाऱ्या वीज ग्राहकांना एकत्र करून संघटना बांधणीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. दोडामार्ग येथील अनेक वीज ग्राहक, लोकप्रतिनिधींनी संघटना स्थापनेचे स्वागत करून संघटनात्मक कार्यात सहभागी होण्याची तयारी दर्शविली असून पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत संघटना बांधणी केली जाणार असून त्याचवेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेत तालुक्यातील समस्या मांडण्याचे ठरविण्यात आले. दोडामार्ग तालुक्यात तीन वीज निर्मिती केंद्र असूनही वीज वितरण बाबाबत तालुक्याला अनेक समस्या भेडसावत आहेत. माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी तालुक्यातील जीर्ण विजेचे खांब, जुनाट वीज वाहिन्या, इमर्जन्सी लोड शेडिंगमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे व वीज वितरणातील दिरंगाई बाबत अधिकारी वर्गाला विचारणा केली असता, सरकारी कामात अडथळा आणला म्हणून केसेस दाखल केल्या जातात अशी व्यथा मांडली, तसेच बंटी उर्फ ज्ञानेश्वर मोरजकर यांनी जुन्या ट्रान्सफॉर्मर व वायरमुळे खुद्द दोडामार्ग शहराला कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याचे व अधिकारी वर्ग उद्धट वर्तन, अरेरावी करत असल्याची तक्रार केली, तर श्रवणकुमार राजपुरोहित यांनी महावितरणने वीज बिलात लावत असलेला वीज अधिभार कमी करावा, इतर राज्यात विजेचा स्थिर आकार कमी असताना महाराष्ट्रात सर्वाधिक का? असा प्रश्न उपस्थित केला. सुदेश मळीक यांनी दोन वर्षे मागणी करूनही शेती पंप जोडणी मिळत नसल्याची तक्रार वीज ग्राहक संघटनेकडे केली. संजय कृष्णा गवस यांनी वीज बिल माफी नको परंतु वीज आकार कमी करावा, तर सुभाष दळवी यांनी तेरवण, मेढे, पाळये आदी ठिकाणी गावात वीज नसते परंतु केरळीयन शेतकऱ्यांच्या बागांमध्ये वीज वितरण सुरळीत सुरू असते असे सांगत महावितरणचे अधिकारी धमक्या देतात, मुजोरी करतात अशी तक्रार केली परंतु वायरमन, लाईनमनच्या सहकार्याचे कौतुकही केले.

यावेळी दशरथ मोरजकर, भूषण सावंत, सुभाष दळवी, लक्ष्मण आयनोडकर, वासुदेव नाईक, श्रवण कुमार राजपुरोहित, कृष्णा धाऊस्कर, शामसुंदर चांदेलकर, प्रणय मोरजकर विलास आसोलकर, मोहन गवंडे, सुदेश मळीक, मिनार मणेरीकर, रूपेश मयेकर, वाल्मिकी कुबल, चंद्रकांत खडपकर आदी वीज ग्राहक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा