कदमवाडीतील विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुखरूप सुटका
कुडाळच्या रेस्क्यू पथकाची तत्पर कारवाई; उपचारानंतर नैसर्गिक अधिवासात सोडले
कुडाळ
कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे कदमवाडी-नळ्याचा पाचा येथील सार्वजनिक विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाने यशस्वी सुटका केली. रेस्क्यू पथकाने बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करून त्याच्यावर आवश्यक उपचार केले आणि त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास येथील नाग्या म्हादू वसतिगृहाचे प्रमुख उदय आईर विहिरीवर गेले असता त्यांना विहिरीतून ओरडण्याचा आवाज ऐकू आला. पाहणी केली असता विहिरीत बिबट्या पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ कुडाळ वनविभाग कार्यालयाला तसेच स्थानिक नागरिकांना याची माहिती दिली.
सकाळी आठच्या सुमारास वनविभागाचे अधिकारी व जलद बचाव पथक (आरआरटी) घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विहिरीत पिंजरा उतरवून बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद केले. आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर त्याला सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
हे बचाव अभियान उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. सहाय्यक वनसंरक्षक एस. के. लाड, कुडाळचे वनक्षेत्रपाल चेतन पाटील, वनपाल सूर्यकांत सावंत, प्रकाश पाटील, वनरक्षक समीर खरवत, प्रसाद पाटील, अनिकेत माने, स्वप्नील सव्हाशे तसेच आरआरटीचे दिवाकर बांबर्डेकर, प्रसाद गावडे, अनिल गावडे, वैभव अमृस्कर, सुशांत करंगुटकर, धनंजय मेस्त्री आणि चालक राहुल मयेकर यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
वनक्षेत्रपाल चेतन पाटील यांनी सांगितले की, भक्ष्याच्या शोधात आलेला हा सुमारे अडीच वर्षांचा बिबट्या विहिरीत पडला असावा. दरम्यान, विहिरीतील पंपांचे मोठे नुकसान झाले असून स्थानिक नागरिक उदय आईर, मोहन कदम, संतोष पानवलकर, आकाश पावसकर, चंद्रकांत मेजारी आणि दुर्गादास झोरे यांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यात वन्यप्राणी मानवी वस्त्यांमध्ये येण्याच्या घटना वाढत असून अशा घटनांमध्ये वनविभागाची रेस्क्यू टीम तत्परतेने कार्यवाही करून वन्यप्राण्यांना सुरक्षितपणे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडत आहे.
