पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास; स्थानिक युवकांना कौशल्य प्रशिक्षणासह रोजगार देणार
सिंधुदुर्ग :
जहाज बांधणी, बंदर विकास, मत्स्यव्यवसाय आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित आणखी अनेक पर्यावरणपूरक प्रकल्प सिंधुदुर्गात आणण्याचे नियोजन असून, पुढील पाच वर्षांत रोजगार निर्मितीला चालना देणारे महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. या सर्व प्रकल्पांचा थेट सकारात्मक परिणाम सिंधुदुर्गच्या अर्थव्यवस्थेवर होईल, असा विश्वास मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या बोट बांधणी प्रकल्पाला मंत्रालयात अधिकृत सुरुवात झाली असून मे.झोया मरीन कंपनी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि महाराष्ट्र शासनाच्या बंदर विभागामध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या कराराअंतर्गत सावंतवाडी तालुक्यातील तळवणे येथे अत्याधुनिक बोट बांधणी कारखाना उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या ५० आणि १०० प्रवासी क्षमतेच्या बोटींची निर्मिती या कारखान्यात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे १०० बोटी तयार करण्याचे काम या प्रकल्पांतर्गत हाती घेण्यात येणार असून, बोटक्राफ्ट, यलो फ्लीट आणि अन्य भागीदार कंपन्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प सिंधुदुर्गात साकारला जाणार आहे.
या प्रकल्पामुळे विविध प्रकारच्या तांत्रिक व कौशल्याधारित रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. रोजगारासाठी इतर जिल्हे, राज्ये किंवा परदेशात गेलेल्या सिंधुदुर्गातील युवक-युवतींना पुन्हा आपल्या जिल्ह्यात रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे पहिले मोठे पाऊल असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
बोट बांधणी उद्योगासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करण्यासाठी युवकांनी आतापासूनच तयारी सुरू करावी, असे आवाहन करत शासनामार्फत आवश्यक कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
