*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ही बाग…तुझी की माझी..!!*
माझ्या बागेची राखण
करणारं फुलपाखरू.. सदैव
मला सांगत असत
ही बाग तुझी आहे..पण
ही फुलं .. माझी आहेत..!
काटयांनी होणा-या जखमा
तुझ्या आहेत
फुलांनी होणा-या जखमा
माझ्या आहेत ……..!
जखमा जखमा काय करतोस
रक्तबंबाळ तुच नाही..मी ही होतो
पंख माझे फुलांना घासून
मी माझा रंग ..त्यांना देतो..
मलाही वेदना होतात
मी गाजावाजा करत नाही
तुझ्या जखमा.. सुगंधी होतात
हे तू!कुणाला कधीच सांगत नाही..
दिवसभर तुझ्या बागेची राखण करतो
कधी विचारलस कां?
तू रात्री कुठे झोपतो…….!
अल्पायुषी जरी असलो मी
तुझ्या बागेवर जीव टाकतो ..!
तुझी आई!माझ्या आईला सांगून गेली
म्हणून तुला ही! मी फुलांसारखं जपतो
मरण्याचं वय मला माहित नाही पण
तुझ्या शिवाय मी जगू शकणार नाही
बाग तुझ्या आईची ..तशी माझ्याही आईची ……ठाऊक आहे मला!
बाग तुझ्यानंतर जगणार ही नाही…!!
गुलाब तुझे माझे निघून जातील..
तुझी आई..माझी आई बागेला भेटायला उडून येणार नाही..
निसर्गदेव दोघींना पाठवणार नाही
बाबा ठाकूर
