You are currently viewing जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला गणनापत्र वाटप व संगणकीकरण मोहिमेचा आढावा

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला गणनापत्र वाटप व संगणकीकरण मोहिमेचा आढावा

कुडाळ आणि मालवण तहसिल कार्यालयालात बैठक संपन्न

कामकाज वेळेत पूर्ण करण्याचे सर्व बी.एल.ओ.,पर्यवेक्षक व संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश

 

सिंधुदुर्गनगरी :

भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्यस्थितीत ‘विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision) कार्यक्रम २०२६’ अंतर्गत मतदार यादी सुधारणा व गणनापत्र (Enumeration Forms) वाटपाचे काम सुरू आहे. या मोहिमेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आज तहसिलदार कार्यालय कुडाळ आणि मालवण येथे जिल्हाधिकारी तृप्‍ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

प्रशासनाने या मोहिमेसाठी निश्चित कालमर्यादा आखून दिली असून, सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (BLO) तसेच त्यांच्या पर्यवेक्षकांनी आपापल्या क्षेत्रातील गणनापत्रांचे १००% वाटप लवकरात लवकर पूर्ण करावे, असे जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी निर्देशित केले. तसेच, नागरिकांकडून संकलित केलेल्या या सर्व गणनापत्राचे अचूक ऑनलाईन संगणकीकरण करण्याचे काम देखील पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जे बी.एल.ओ. (BLO) किंवा संबंधित अधिकारी या प्रक्रियेत वेळेत काम पूर्ण करणार नाहीत किंवा तांत्रिक अडचणींशिवाय कामात असहकार्य करतील, त्यांच्यावर नाईलाजाने निलंबनाचा प्रस्ताव ठेवण्यासारखी प्रशासकीय शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी सांगितले.

या बैठकीत कुडाळ आणि मालवण तालुक्‍यातील मतदारांना गणनापत्र वाटप अपेक्षेपेक्षा कमी झाल्याचे निदर्शनास आल्याने, जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी संबंधित क्षेत्रीय अधिकारी व यंत्रणेला कामाला गती देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व योग्य पावले उचलण्याचे निर्देश दिले.

सदर आढावा बैठकीस मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील, गणेश लव्हे, निवासी नायब तहसीलदार, नायब तहसीलदार, गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, तालुका कृषी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, तसेच सर्व बी.एल.ओ. (Booth Level Officer) पर्यवेक्षक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा