You are currently viewing सहकार सप्ताह निमित्त वैभववाडी महाविद्यालयात व्याख्यान व वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न

सहकार सप्ताह निमित्त वैभववाडी महाविद्यालयात व्याख्यान व वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न

*सहकार सप्ताह निमित्त वैभववाडी महाविद्यालयात
व्याख्यान व वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न*

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबईचे आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात सहकार सप्ताह निमित्त व्याख्यान व वृक्षारोपण करून सहकार सप्ताह साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या मार्गदर्शनाखाली दि. २९ जून ते ६ जुलै २०२६ या कालावधीत साजऱ्या करण्यात आलेल्या सहकार सप्ताह निमित्त महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील आनंदीबाई रावराणे कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, वैभववाडी, कॉमर्स असोसिएशन
आणि सहकारी अधिकारी श्रेणी-१, सहकारी संस्था कार्यालय, वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने “सहकाराचे राष्ट्रीय विकासातील योगदान व सामर्थ्य” या विषयावर विशेष व्याख्यान व वृक्षारोपण कार्यक्रम सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी संस्थेचे विश्वस्त श्री.शरदचंद्र रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर सहकार अधिकारी श्री.अभिनव विचारे, प्रमुख वक्ते प्रा. सत्यजीत राजे
पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, उपाध्यक्ष प्रा.रणजित पाटील, सचिव डॉ.किरण पाटील, कार्यालयीन अधीक्षक श्री.संजय रावराणे व डॉ.राहूल भोसले उपस्थित होते.
सहकार सप्ताहानिमित्त सहकार चळवळीचा प्रसार, जनजागृती व सामाजिक बांधिलकी दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता.
सुरूवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आले.
प्रा.सुरेश पाटील यांनी आपल्या प्रस्तावित भाषणात सहकार सप्ताहाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. समाजातील सर्व स्तरांपर्यंत सहकाराची भावना पोहोचावी, सामूहिक प्रयत्नांतून आर्थिक आणि सामाजिक विकास साधावा तसेच युवकांनी सहकाराच्या माध्यमातून नव्या संधींचा शोध घ्यावा, असे त्यांनी सांगितले. सहकार अधिकारी श्री. अभिनय विचारे यांनी सहकार सप्ताहाचे महत्त्व विशद करताना सहकार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. सहकाराच्या माध्यमातून वंचित, दुर्बल आणि ग्रामीण घटकांचा सर्वांगीण विकास साधता येतो. सहकार ही केवळ आर्थिक व्यवस्था नसून सामाजिक परिवर्तनाची प्रभावी चळवळ असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रमुख वक्ते प्रा. सत्यजित राजे यांनी आपल्या व्याख्यानात सहकार चळवळीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, भारतातील सहकाराचा विकास, कृषी, उद्योग, रोजगारनिर्मिती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासातील सहकाराचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. रोजगाराची वाट न पाहता युवकांनी एकत्र येऊन सहकारी संस्थांच्या माध्यमातून उद्योग-व्यवसाय सुरू केल्यास आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होण्यास मोठी मदत होईल. सहकारामुळे सामूहिक नेतृत्व, आर्थिक स्वावलंबन आणि शाश्वत विकासाला चालना मिळते असे त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात विश्वस्त श्री. शरदचंद्र रावराणे यांनी सहकार क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे सांगत प्रत्येकाने सहकाराच्या माध्यमातून स्वावलंबन स्वीकारून आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन केले. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार ही प्रभावी आणि लोकाभिमुख चळवळ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी,
प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. राहुल भोसले यांनी केले. शेवटी महाविद्यालय परिसरात महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. सहकार आणि पर्यावरण संरक्षण या दोन्ही सामाजिक मूल्यांचा संगम घडविणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा