You are currently viewing माजगावच्या शेतकऱ्यांच्या नकाशांचा २४ वर्षांचा प्रश्न अखेर मार्गी; विक्रांत सावंत यांच्या पाठपुराव्याला यश
Oplus_16908288

माजगावच्या शेतकऱ्यांच्या नकाशांचा २४ वर्षांचा प्रश्न अखेर मार्गी; विक्रांत सावंत यांच्या पाठपुराव्याला यश

पालकमंत्री नितेश राणे यांचे संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नकाशे उपलब्ध करून देण्याचे निर्देश

सावंतवाडी : तब्बल २४ वर्षांपासून जमिनींच्या नकाशांअभावी विविध शासकीय कामांसाठी अडचणींचा सामना करणाऱ्या माजगाव येथील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी हा रखडलेला प्रश्न थेट पालकमंत्री नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून देत तातडीने तो मार्गी लावण्याची मागणी केली. त्याची गंभीर दखल घेत पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नकाशे उपलब्ध करून देण्याचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले.

सन २००० मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा वेगळा झाल्यापासून माजगाव येथील शेतकरी नकाशांसाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. मात्र नकाशे उपलब्ध नसल्याने जमिनीच्या हद्दी निश्चित करणे, तसेच अवकाळी पाऊस आणि वन्य प्राण्यांमुळे झालेल्या शेती नुकसानीच्या भरपाईसाठी प्रस्ताव सादर करताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

या प्रशासकीय दिरंगाईला कंटाळून माजी पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण सावंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले होते. त्यानंतर प्रशासनाने दोन महिन्यांत नकाशे देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र आश्वासनाची अंमलबजावणी होत नसल्याने विक्रांत सावंत यांनी हा विषय पालकमंत्री नितेश राणे यांच्यासमोर ठामपणे मांडला.

यावेळी विक्रांत सावंत यांनी माजगावच्या शेतकऱ्यांची अडचण आणि प्रशासकीय दिरंगाईची संपूर्ण माहिती पालकमंत्र्यांना दिली. त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत, “माजगावच्या शेतकऱ्यांची मागणी रास्त असून, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार नकाशे देण्याचे काम तात्काळ सुरू करावे,” अशा स्पष्ट सूचना दिल्या.

पालकमंत्र्यांच्या या निर्देशांमुळे आता माजगावच्या शेतकऱ्यांच्या जमिनींच्या नकाशांचा तब्बल २४ वर्षांचा रखडलेला प्रश्न निकाली निघण्याचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा