You are currently viewing आडाळी एमआयडीसीला मोठा दिलासा

आडाळी एमआयडीसीला मोठा दिलासा

भूखंडांवरील स्थगिती उठली, गोल्फ कोर्स प्रकल्प रद्द, उद्योगवाढीसाठी महत्त्वाचे आठ निर्णय

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात विशेष बैठक; आमदार दीपक केसरकर यांच्या आग्रही मागणीला यश

मुंबई  :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीमधील भूखंड वाटप, उद्योग सुरू करण्यातील अडचणी तसेच विविध प्रलंबित समस्यांच्या निवारणासाठी आज (२ जुलै २०२६) महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या आग्रही मागणीनुसार झालेल्या या बैठकीत आडाळी एमआयडीसीला गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

बैठकीत आडाळी एमआयडीसीमधील ज्या उद्योजकांनी यापूर्वी भूखंड खरेदी केले होते, त्यांच्या भूखंडाचा ताबा देणे, करार प्रक्रिया पूर्ण करणे तसेच बांधकाम परवानगी देण्यावरील स्थगिती तातडीने उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अनेक उद्योजकांना दिलासा मिळणार असून प्रलंबित उद्योग प्रकल्पांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यासोबतच इच्छुक उद्योजकांसाठी नवीन भूखंड वाटपाची ऑनलाइन प्रक्रिया येत्या दोन आठवड्यांत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्याने उद्योग उभारू इच्छिणाऱ्या उद्योजकांना या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

बैठकीतील आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे आडाळी एमआयडीसी परिसरातील प्रस्तावित गोल्फ कोर्स प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी उद्योगवाढ आणि गुंतवणुकीला प्राधान्य देण्यात येणार आहे.

आडाळी एमआयडीसीमध्ये अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि नवीन उद्योगांना चालना देण्यासाठी येत्या ऑगस्ट महिन्यात गोवा येथे विशेष गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्याचेही निश्चित करण्यात आले.

सिंधुदुर्गातील उद्योजकांना एमआयडीसीच्या कामासाठी वारंवार रत्नागिरी येथे जावे लागू नये, यासाठी आडाळी येथे दर गुरुवारी एमआयडीसीच्या विभागीय कार्यालयातील अधिकारी उपलब्ध राहून उद्योजकांच्या कार्यालयीन कामकाजाचा निपटारा करतील, असा महत्त्वपूर्ण निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

आडाळी एमआयडीसीसाठी उभारण्यात आलेले विद्युत उपकेंद्र कार्यान्वित झाले असले, तरी इन्सुली ते आडाळी पर्यायी ३३ केव्ही वीजवाहिनीचे काम संथ गतीने सुरू असल्याची बाब बैठकीत मांडण्यात आली. हे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देण्यात आले.

तसेच तिलारी पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचा उपयोग करून डेटा सेंटरसारखे मोठे उद्योग किंवा तत्सम प्रकल्प उभारण्याच्या शक्यतेची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले. याशिवाय आडाळी एमआयडीसीमधील इतर विविध समस्यांवरही सकारात्मक चर्चा करून उद्योगवाढीसाठी आवश्यक निर्णय घेण्यात आले.

या बैठकीला उद्योग विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य अभियंता (मुख्यालय), उद्योग विभागाचे सहसचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक (भूमी), प्रादेशिक अधिकारी, संबंधित अधिकारी तसेच सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे या ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होत्या.

दरम्यान, आपल्या आग्रही मागणीनुसार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तातडीने बैठक घेऊन आडाळी एमआयडीसीच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल आमदार दीपक केसरकर यांनी उद्योगमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी या निर्णयांमुळे आडाळी एमआयडीसीमध्ये उद्योगांना मोठी चालना मिळेल, रोजगारनिर्मिती वाढेल आणि सिंधुदुर्गच्या औद्योगिक विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा