You are currently viewing घारपी शाळेत झाडांचा वाढदिवस साजरा करून कृषीदिन साजरा

घारपी शाळेत झाडांचा वाढदिवस साजरा करून कृषीदिन साजरा

घारपी शाळेत झाडांचा वाढदिवस साजरा करून कृषीदिन साजरा

*बांदा*

कृषी दिन म्हटले की वृक्षारोपण, शेतकरी आणि शेतीचा सन्मान हे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. मात्र सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घारपी येथील विद्यार्थ्यांनी यावर्षी कृषी दिनाला एक वेगळीच आणि हृदयस्पर्शी दिशा दिली. नव्याने झाडे लावण्याबरोबर शाळेच्या आवारात लावलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करून त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याचा अनोखा संदेश विद्यार्थ्यांनी समाजासमोर ठेवला. विद्यार्थ्यांनी रोपट्यांच्या रूपात लावलेली झाडे आज बहरलेली पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. त्या प्रत्येक झाडाभोवती प्रेमाने फेर धरत विद्यार्थ्यांनी त सेंद्रिय खत दिले, परिसर स्वच्छ केला आणि झाडांच्या निरोगी वाढीसाठी सामूहिक प्रार्थना केली. यावेळी विद्यार्थ्यांना सेंद्रिय खतापासून झाडांसाठी केकही बनवला होता. झाडांशी जिव्हाळ्याचे नाते जोडणारा हा उपक्रम उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून गेला.
यावेळी विद्यार्थ्यांनी “झाडे लावूया… झाडे जगवूया!”, “एक मूल दोन झाडे –”, “वृक्ष वाचवा, भविष्य घडवा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. पर्यावरण संवर्धनावरील कविता, घोषवाक्यातून चिमुकल्यांनी निसर्गाविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त केली. झाडे ही केवळ सजीव नसून आपल्या जीवनाची आधारवड आहेत, हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून प्रभावीपणे दिला. विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी फुगे व पताका लावून झाडांची आकर्षक सजावट केली होती.यावेळी झाडांचे औक्षण केले व विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करण्यात आला.
मुख्याध्यापक श्री. जे. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “झाडे लावणे ही सुरुवात असते; परंतु त्यांना जगवणे हेच खरे पर्यावरणप्रेम आहे. झाडांचा वाढदिवस साजरा करण्यामागील उद्देश विद्यार्थ्यांच्या मनात वृक्षांविषयी माया, जबाबदारी आणि संवर्धनाची भावना रुजवणे हा आहे. आजची ही कृती उद्याच्या हरित भारताचा मजबूत पाया ठरेल.” कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक जे.डी.पाटील यांच्या बरोबर सहकारी शिक्षक धर्मराज खंडागळे, आशिष तांदुळे यांनी विशेष परिश्रम घेतले
या उपक्रमात शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रत्येक विद्यार्थ्याने एका झाडाची जबाबदारी स्वीकारत त्याच्या नियमित संगोपनाचा संकल्प केला.
आजच्या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर केवळ वृक्षारोपण न करता वृक्षसंवर्धनाची संस्कृती रुजविण्याचा संदेश घारपी शाळेने कृतीतून दिला आहे. चिमुकल्या हातांनी साजरा केलेला झाडांचा हा वाढदिवस केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर निसर्गाशी नाते जपण्याचा, पृथ्वीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि भावी पिढीला हरित भविष्यासाठी तयार करण्याचा एक प्रेरणादायी संस्कार सोहळा होता.
झाडांचा वाढदिवस साजरा करत घारपी शाळेने कृषी दिनाला खऱ्या अर्थाने जीवन, निसर्ग आणि पर्यावरणाचा उत्सव बनवला.

प्रतिक्रिया व्यक्त करा