दोडामार्ग जागतिक पर्यटन नकाशावर झळकणार – विष्णू मोंडकर
आमदार प्रमोद जठार यांच्या पाठपुराव्याला यश; तिलारी खोऱ्यात उभारल्या जाणाऱ्या राष्ट्रीय उद्यानामुळे बारमाही पर्यटन, जंगल सफारी आणि हजारो रोजगाराच्या संधींना चालना
मालवण :
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विशेषतः दोडामार्ग तालुक्याच्या पर्यटन आणि आर्थिक विकासाला ऐतिहासिक चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि गुजरातमधील जगप्रसिद्ध ‘वनतारा’ प्रकल्पाच्या धर्तीवर दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात भव्य राष्ट्रीय उद्यान उभारण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात आमदार प्रमोद जठार यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना ही घोषणा केली. या उद्यानाला ‘श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय उद्यान’ असे नाव देण्यात येणार आहे.
या निर्णयाचे पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी स्वागत करत, “या प्रकल्पामुळे दोडामार्ग तालुका थेट जगाच्या आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर झळकणार आहे,” असा विश्वास व्यक्त केला. या प्रकल्पामुळे दोडामार्गचा चेहरामोहरा बदलणार असून सिंधुदुर्गातील समृद्ध जैवविविधता आणि निसर्गसंपदा जागतिक स्तरावर पोहोचेल. तसेच पर्यटन, हॉटेल, वाहतूक, मार्गदर्शक सेवा आणि स्थानिक उद्योगांना मोठी चालना मिळून हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.
वनमंत्र्यांच्या घोषणेनंतर स्थानिक पर्यटन व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विष्णू मोंडकर म्हणाले, “दोडामार्ग तालुक्याला निसर्गाने भरभरून वैभव दिले आहे. आमदार प्रमोद जठार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या मंजुरीमुळे दोडामार्गच्या शाश्वत विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे राष्ट्रीय उद्यान उभारले गेल्यानंतर जगभरातील पर्यटकांची पावले दोडामार्गकडे वळतील.”
विस्तीर्ण वनक्षेत्र आणि समृद्ध जैवविविधतेमुळे तिलारी खोऱ्याला ‘सिंधुदुर्गचे अॅमेझॉन’ म्हणून ओळखले जाते. हा परिसर ‘टायगर कॉरिडॉर’ म्हणूनही प्रसिद्ध असून येथे सिंह वगळता अनेक प्रकारचे वन्यजीव नैसर्गिक अधिवासात आढळतात. राष्ट्रीय उद्यानासोबत जंगल सफारी सुरू झाल्यास सिंधुदुर्गातील पर्यटनाला बारमाही स्वरूप प्राप्त होणार असून कोकणातील पर्यटनाला नवी दिशा मिळेल.
या राष्ट्रीय उद्यानामुळे मोपा विमानतळाच्या जवळ असल्याने देश-विदेशातील पर्यटकांना सहज आकर्षित करता येणार आहे. गुजरातच्या ‘वनतारा’ प्रकल्पाच्या धर्तीवर वन्यजीव संवर्धन, अत्याधुनिक सुविधा आणि पर्यटन विकासाचा समन्वय साधला जाणार आहे. जंगल सफारी, निसर्ग पर्यटन आणि पर्यावरण संवर्धन यांचा संगम साधणारा हा प्रकल्प दोडामार्गच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
हॉटेल व्यवसाय, होमस्टे, ट्रॅव्हल्स, स्थानिक मार्गदर्शक, हस्तकला व स्थानिक उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार असून हजारो युवकांना रोजगाराच्या नव्या संधी मिळतील, असा विश्वास पर्यटन व्यावसायिक महासंघाने व्यक्त केला आहे.
या ऐतिहासिक निर्णयासाठी आमदार प्रमोद जठार, वनमंत्री गणेश नाईक तसेच राज्य सरकारचे पर्यटन व्यावसायिक महासंघाने आभार मानले आहेत.
