You are currently viewing माझ्या शाळेचे मुख्याध्यापक

माझ्या शाळेचे मुख्याध्यापक

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

*माझ्या शाळेचे मुख्याध्यापक..*

विषय दिसल्याबरोबर मी थेट कापडण्याच्या
हायस्कूलमध्येच पोहोचले. नदीच्या पलीकडे गांव व नदी ओलांडून देवभाने रस्त्याला आमची
नवी हायस्कूलची इमारत उभी होती. अजून कामे
चालूच होती. काही वर्ग जुन्या जागेत भरत होते.
वरच्या मजल्यावर बसून नदी पलीकडे वाडी दिसत असे जिथे आम्ही दुपारच्या मधल्या सुटीत
मनसोक्त हिंडत असू नदीकाठावर.

हायस्कूल सुरू झाले. नव्या वह्या पुस्तके आली.
त्यांना कव्हरे घालून झाली.आम्ही रस्त्याने रमतगमत एस टी स्टॅंण्डवरील रंगीत गुच्छांची फुले व हवेत उडणाऱ्या म्हाताऱ्या पकडत उत्साहाने नदी ओलांडत हायस्कूल मध्ये जात होतो. नुकतेच वर्ग सुरू झाले होते. आमचा वर्ग
वरच्या मजल्यावर असल्यामुळे आम्हाला खूप मजा येत होती.

तशात एक दिवस कळले की, शेजारच्या न्यहाळोद गावाहून नवे हेडमास्तर बदलून आले
आहेत. आम्ही काही त्यांना पाहिले नव्हते. मराठीचा तास होता. अजून टीचर लोकांची तशी
ओळख झालेली नव्हतीच. तेवढ्यात हातात मराठीचे पुस्तक घेऊन एक टीचर वर्गात आले होते. आम्ही “गुड अफ्टरनून सर”
म्हणत ताडकन उभे राहिलो. मुलींच्या तीन व मुलांच्या तीन रांगा होत्या. ते बसा म्हणाले, आम्ही
बसलो. “मराठीचे पुस्तक काढा”, ते म्हणाले. आम्ही काढले. पेज नंबर सांगितले ते काढले. तर
ती होती” श्रावण बाळाची” प्रसिद्ध कविता.
खड्या आवाजात सरांनी गायला सुरुवात केली.
आम्ही थक्क. त्यांच्या मागून एका सुरात आम्हीही गाऊ लागलो.

शर आला तो, धावुनि आला काळ
विव्हळला श्रावणबाळ…
हा! आई गे!
दीर्घ फोडुनि हाक
तो पडला जाऊन झोक..
ये राजाच्या श्रवणी करुणा वाणी
हृदयाचे झाले पाणी
त्या ब्राह्मणपुत्रा बघुनि
शोकाकुल झाला नृमणी
आसवे आणूनी नयनी
तो वदला, हा हंत! तुझ्या नाशाला
मी पापी कारण बाळा..

सर असे काही गात होते की, सर्वांच्या डोळ्यांना
धारा लागल्या. आम्ही तर स्फुंदून स्फुंदून रडू
लागलो. सरांनी गातांनाच इतक्या भावना ओतल्या होत्या की, गाता गाताच कविता आमच्या हृदयात शिरली. ते काही कविता शिकवायला आले नव्हते तर आले होते फक्त
चाली लावायला.

लगेच दुसरी कविता काढायला लावली.

पोर खाटेवर मृत्युच्याच दारा
कुणा गरिबाचा तळमळे बिचारा;
दूर आई राहिली कोकणात,
सेविकेचा आधार एक हात !
ताप त्याने भरताच तडफडावे;
पाखराने एकले फडफडावे
ह़ळू गोंजारी सेविका दयाळू;
डाक्तराचे वच शांतवी कृपाळू.
कधी त्याने घ्यावे न मुळी अन्न,
कुठे डोळे लावून बसे खिन्न;
आणि डाक्तर येतांच गोंजराया
हाय ! लागे तो घळघळा रडाया !
एक दिन तो व्याकूळ फार झाला
आणि त्याने पुशिलेच डाक्टराला -
”अतां दादा, मरणार काय मी हो ?”
तोंच लागे अश्रुची धार वाहो !
हृदय हलुनी डोळ्यात उभे पाणी,
तरी डाक्तरची वदे करुण वाणी;
दोन गोष्टी सांगून धीर देई
पुन्हा गोंजारुन शांतवून जाई.
रात्र अंधारी माजली भयाण
सोसवेना जीवास अतां ताण
हळुच बोलावी बाळ डाक्तराला
तोहि धर्मात्मा धांवुनीच आला
अतां बाळाला टोचणार, तोच
वदे वासुन पांखरू दीन चोंच -
”नको आता ! उपकार फार झाले !
तुम्ही मजला किति…गोड…वागवीले !
भीत…दादा…मरणास…मुळी…नाही !
तु…म्ही…आई…!!” बोलला पुढे नाही !
झणी डोळे फिरविले बाळकाने
आणि पुशिली लोचनी डाक्तराने.

बघा, वाचता वाचताच डोळे भरून आले ना?
पुन्हा करूण रस.. आम्ही सुन्न झालो.

ते चाली लावायला आले होते, जेणेकरून कविता
लगेच पाठ होतात. अशा एकामागून एक ते चाली
लावत गेले व आम्ही म्हणत गेलो. पुढची कविता
होती..” उभे भवती प्रासाद गगनभेदी “ ती ही आम्ही गायलो. बघा, पहिल्याच दिवशी हेडमास्तर येतात
काय, चाली लावतात काय, खरंच सांगते, एवढे वय झाले पण अजून ह्या कविता माझ्या स्मृतीतून गेल्या नाहीत. तीच गोष्ट..” खबरदार
जर टाच मारुनी जाल पुढे,”.. असे हेडमास्तर कसे
लक्षात राहणार नाहीत? त्यांना आम्ही कधी घाबरलोच नाही. जवळ जवळ आठवडाभर वर्गावर्गात त्यांचा हा कार्यक्रम चालू होता.

त्याकाळी हेडमास्तरच काय शिक्षकही कर्तव्य
दक्ष होते. तास बुडवणे? छे! ही संकल्पनाच
अस्तित्वात नव्हती. ग्राऊंडवर खेळही अप्रतिम
व मॅचेसही अप्रतिम होत असत. त्यामुळे तो काळ
सुवर्णकाळ म्हणूनच डोक्यात फिट्ट आहे. मी तरी
मी घरी कधी अभ्यास केल्याचे स्मरत नाही. केला
असता तर किती बरे झाले असते ना? जाऊ द्या.

आणखी काही हेडमास्तर भेटले असतील. पण ते
माझ्या स्मरणात नाहीत.बऱ्याच गोष्टी विस्मृतीत
गेल्या आहेत. हा विषय आला म्हणून या साऱ्या
गोष्टी आठवल्या.त्या काळाची या काळाशी
तुलनाच होऊ शकत नाही. त्यावेळी शिक्षणच
ज्ञानार्थी होते. आता ज्ञानाचा व शाळेचा काही
संबंधच नाही. आता आहेत परीक्षार्थी घडवणारे कारखाने. आणि त्यातून घडतात, आय टी, आय
आय टी, डॅाक्टर, इंजिनिअर, एम बी ए, सी ए जे पुढे करोडोंचे पॅकेज मिरवतात व तासंतास बसून
स्थूल होतात. त्यांचा नि व्यायामाचाही काही संबंध नसतो. दरवर्षी त्यांची स्थावरजंगम संपत्ती
गणिती श्रेणीने वाढत जाते. मग बायकोही त्यांना
त्याच तोलामोलाची मिळते. पॅकेजवाली. आणि
मग कहाणी सुफल संपूर्ण होते. ते दोघेही पुढे
परदेशात जातात व त्यांचे आईवडिल येथे वृद्धाश्रमात डोळेथकून मरतात. त्यांच्या अंत्यविधीलाही ते भरगच्च पॅकेज पाठवतात
व समाधानाने राहतात. इति.. कहाणी संपूर्ण..

प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा