*कोकण मराठी साहित्य परिषद मालवणचे सदस्य विजयकुमार शिंदे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*बरस बरस रे मेघा*
बरस बरस रे मेघा आता, बरस बरस रे मेघा
तप्त तापल्या या धरणीला दान जलाचे देगा
क्रोधित झाला गगनी दिनकर
सहस्र सोडीत किरणांचे शर
त्याच शरांनी विद्ध होऊनी धरणीस पडल्या भेगा
बरस बरस रे मेघा आता, बरस बरस रे मेघा
तृषार्त झाडे अन् पशू-पक्षी
जीवन देऊन त्यांना रक्षी
करी प्रतीक्षा कृषीवल त्याला नको दाखवू ठेंगा
बरस बरस रे मेघा आता, बरस बरस रे मेघा
विहिरी आटल्या गढूळ पाणी
पाण्यासाठी आणीबाणी
फिरती वणवण बाया त्यांच्या काय म्हणावे भोगा?
बरस बरस रे मेघा आता, बरस बरस रे मेघा
जीव असा कासावीस होई
दया तुला का येतच नाही?
ठेविलेस तू जखडून का रे मुक्त तुझ्या आवेगा?
बरस बरस रे मेघा आता, बरस बरस रे मेघा
दयार्द्र होऊन ये तू आता
सज्जच सारे तुझ्या स्वागता
कर तू वृष्टी हिरवी सृष्टी बहरू यावी वेगा
बरस बरस रे मेघा आता, बरस बरस रे मेघा
— विजयकुमार शिंदे,
कणकवली
