You are currently viewing मोरगाव नं.१शाळेत झाडांचे रोप देऊन नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत

मोरगाव नं.१शाळेत झाडांचे रोप देऊन नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत

मोरगाव नं.१शाळेत झाडांचे रोप देऊन नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत

*दोडामार्ग*

नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी मोरगाव नं. १ शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आले. शाळा प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना झाडांची रोपे भेट देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची हिरवीगार सुरुवात करण्यात आली.
शाळेच्या आवारात आनंदी वातावरणात नवागत विद्यार्थी आणि पालकांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोप देण्यात आले. या रोपांचे संगोपन करण्याचा संकल्पही विद्यार्थ्यांनी यावेळी केला.
याचबरोबर समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. नवीन पुस्तके हातात मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.या दिवस शाळेत पुस्तकरुपी गुढी उभी करण्यात आली होती.
या कार्यक्रमाला दोडामार्ग तालुका गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय ठाकूर, उपाध्यक्ष देविदास पिरणकर, तसेच पालक, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत नियमित उपस्थिती, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका भाग्यश्री कुबल, सहकारी शिक्षक ज्ञानेश्वर सावंत, संतोष गवस, स्वाती पाटील, अंगणवाडी सेविका हेमा नाईक तसेच मदतनीस सुप्रिया कदम,किरण लोकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
ज्ञान, संस्कार आणि पर्यावरणप्रेमाचा संदेश देणारा हा प्रवेशोत्सव विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरला. हातात पाठ्यपुस्तके, सोबत हिरवेगार रोप आणि मनात उज्ज्वल भविष्याची स्वप्ने घेऊन विद्यार्थ्यांनी नव्या शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा