केवल ठाकूरदेसाईंसह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश; नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा उत्साहात
देवगड :
देवगड तालुक्यातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख यदुनाथ ठाकूरदेसाई यांनी आपल्या प्रमुख सहकारी केवल ठाकूरदेसाई आणि असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या घडामोडीमुळे ठाकरे गटाला स्थानिक पातळीवर मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात ठाकूरदेसाई यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी राणे यांनी त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देत पक्ष संघटन बळकट करण्याचे आवाहन केले.
देवगड तालुक्यातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या यदुनाथ ठाकूरदेसाई यांच्या भाजप प्रवेशामुळे तालुक्यात भाजपची राजकीय ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे ठाकरे गटासाठी हा धक्का मानला जात असून आगामी काळात स्थानिक राजकीय समीकरणांवर त्याचे परिणाम दिसून येऊ शकतात.
या सोहळ्याला भाजप देवगड तालुकाध्यक्ष बंड्या नारकर यांच्यासह प्रकाश गोगटे, भूषण पोकळे, अंकुश ठुकरूल, विनोद सुके, संदीप पुजारे, सुहास वाडेकर, शशांक तावडे, समीर तावडे, शेखर सुतार, संजय तावडे तसेच पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
राजकीय क्षेत्रात सक्रिय आणि संघटनात्मक पातळीवर प्रभाव असलेल्या ठाकूरदेसाई यांच्या निर्णयामुळे देवगड तालुक्यातील राजकीय वातावरण अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.
