You are currently viewing ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध

महावितरण अधिकाऱ्यांची वैभववाडीत भेट घेऊन शिवसैनिकांनी विचारला जाब..

वैभववाडी :

मागील दोन दिवसांपासून वैभववाडी तालुक्यातील वीज ग्राहकांच्या मोबाईलवर “पुढील ४८ तासांत विद्यमान मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहे” असे संदेश प्राप्त होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालय, वैभववाडी येथे अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत जाब विचारण्यात आला.
यावेळी महावितरण अधिकाऱ्यांनी सदर संदेश हे केंद्रीय कार्यालयामार्फत (Central Office) पाठविण्यात आले असून, स्थानिक स्तरावर अद्याप ग्राहकांच्या मीटर बदलाबाबत कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत, अशी माहिती शिष्टमंडळाला दिली.
शिवसेनेच्या वतीने यावेळी ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय कोणत्याही प्रकारचे स्मार्ट मीटर बसविण्यात आल्यास त्यास तीव्र विरोध केला जाईल, अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली. स्मार्ट मीटर संदर्भात नागरिकांच्या मनात अनेक शंका असून त्यांचे समाधान होणे आवश्यक असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
याशिवाय महावितरणच्या विविध कामांबाबतही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या. विशेषतः नवीन वीज खांब (पोल) उभारताना संबंधित जमीन मालकाची पूर्वसंमती घेण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊनच काम करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
शेतजमिनीत वीज खांब उभारताना शेतकऱ्यांच्या शेती कामात अडथळा निर्माण होणार नाही, पायवाटा बंद होणार नाहीत आणि शेतीचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही महावितरण प्रशासनाला देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना तालुका सचिव गुलजार काझी, युवासेना तालुका प्रमुख रोहित पावसकर, महिला तालुका संघटक दिव्या पाचकुडे, स्वप्नील रावराणे,ओमकार इस्वलकर तसेच अन्य शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नागरिकांच्या हिताचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी पक्ष सदैव कटिबद्ध असल्याचे सांगत, ग्राहकांच्या अधिकारांवर गदा आणणारा कोणताही निर्णय सहन केला जाणार नाही, असा इशाराही यावेळी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा