You are currently viewing आंबोलीतील सीएनजी पंप दोन महिन्यांपासून बंद; रिक्षाचालक व पर्यटकांची गैरसोय

आंबोलीतील सीएनजी पंप दोन महिन्यांपासून बंद; रिक्षाचालक व पर्यटकांची गैरसोय

आंबोलीतील सीएनजी पंप दोन महिन्यांपासून बंद; रिक्षाचालक व पर्यटकांची गैरसोय

कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाची प्रशासनाकडे धाव; पंप तातडीने सुरू करण्याची मागणी

आंबोली

प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंबोली येथील अमित रसाळ यांच्या पेट्रोल पंपावर सीएनजी युनिट बसवून सुमारे दोन ते अडीच महिने उलटले आहेत. मात्र, तांत्रिक अडचणींचे कारण देत हे युनिट अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही. दरम्यान, वर्षा पर्यटन हंगाम सुरू झाल्याने आंबोलीमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होत असून सीएनजी सुविधा उपलब्ध नसल्याने स्थानिक रिक्षाचालक, वाहनधारक तसेच पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे.
सध्या सीएनजी भरण्यासाठी वाहनधारकांना सावंतवाडी किंवा थेट आजरा येथे जावे लागत आहे. त्यामुळे वेळ आणि आर्थिक खर्च वाढत असून अनेकदा सीएनजीअभावी वाहने वाटेतच बंद पडण्याच्या घटनाही घडत आहेत. पेट्रोलच्या वाढत्या दरांमुळे रिक्षाचालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून त्यांच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम होत आहे.
या गंभीर प्रश्नाची दखल घेत कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाने सावंतवाडीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर केले आहे. यापूर्वी सावंतवाडीतील पावसकर पेट्रोल पंपावरील सीएनजी युनिट प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर सुरू करण्यात आले होते. त्याच धर्तीवर आंबोलीतील संबंधित पंपचालकाला प्रशासकीय नोटीस बजावून सीएनजी सेवा तातडीने सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी महासंघाने केली आहे.
पर्यटन हंगामात आंबोली परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. अशावेळी सीएनजी सुविधा उपलब्ध झाल्यास स्थानिक वाहनधारकांसह पर्यटकांनाही मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत वाहनचालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा