You are currently viewing श्रद्धेचे केंद्र बनावे, बाजार नव्हे! – मंदिरांच्या व्यापारीकरणावर शंकर गायकर यांची खंत
Oplus_16908288

श्रद्धेचे केंद्र बनावे, बाजार नव्हे! – मंदिरांच्या व्यापारीकरणावर शंकर गायकर यांची खंत

कुणकेश्वर भेटीत मंदिरांच्या स्वायत्ततेचा मुद्दा; सरकारी हस्तक्षेप कमी करून विश्वस्त मंडळांवर विश्वास ठेवण्याची मागणी

देवगड :

हिंदू मंदिरांची ज्या आत्मीयतेने, श्रद्धेने आणि तळमळीने सेवा व्हायला हवी, ती अनेक ठिकाणी होताना दिसत नाही. सरकारी यंत्रणेकडून मंदिरांचे व्यवस्थापन केले जात असले तरी अनेक ठिकाणी ते केवळ नोकरीच्या दृष्टिकोनातून चालवले जात असल्याचे दिसते. मात्र गावागावातील स्थानिक मंडळी ज्या भावनेने, हृदयापासून आणि भक्तिभावाने मंदिरांचे पावित्र्य जपतात, तशी भावना सरकारी व्यवस्थेत अनेकदा दिसून येत नाही, असे मत विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री शंकर गायकर यांनी व्यक्त केले.

सोमवारी त्यांनी ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या श्री देव कुणकेश्वर मंदिराला भेट दिली. यावेळी मंदिर परिसराची पाहणी करून त्यांनी मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला.

कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष एकनाथ तेली यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विजय राऊत, महेश नाईक, हरिश्चंद्र राऊत, अनिल येवले, गणेश वाळके, हेमंत वातकर, उदय पेडणेकर, संजय वाळके तसेच सरपंच महेश ताम्हणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना गायकर म्हणाले की, पंढरपूर, शनिशिंगणापूरसह अनेक मोठ्या देवस्थानांची आजची परिस्थिती चिंताजनक आहे. हिंदू भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या निधीचा वापर अपेक्षित पद्धतीने होत नसल्याची भावना अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. विशेषतः कर्नाटकसारख्या राज्यांमध्ये मंदिरांना मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळतात; मात्र त्या निधीचा उपयोग मंदिर विकास, धार्मिक कार्ये आणि भाविकांच्या सुविधांसाठी पुरेशा प्रमाणात होताना दिसत नाही.

“सरकारने मंदिरांच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप करण्याऐवजी त्या त्या देवस्थानांतील विश्वस्त मंडळांवर विश्वास दाखवावा. स्थानिक विश्वस्त आणि भक्तगण मंदिरांचे व्यवस्थापन अधिक जबाबदारीने आणि पारदर्शकपणे करू शकतात, असा अनुभव अनेक ठिकाणी आला आहे,” असे त्यांनी नमूद केले.
हिंदू देवस्थानांमध्ये अनेक ठिकाणी धर्माशी संबंध नसलेल्या व्यक्तींची नियुक्ती केली जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. अशा नियुक्त्या योग्य पद्धतीने झालेल्या नसून त्यामागे राजकारण आणि व्यापारीकरण वाढल्याचे चित्र दिसत आहे, असे ते म्हणाले.

तिरुपती बालाजी मंदिराचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, “श्रद्धेच्या केंद्रस्थानी असलेल्या देवस्थानांचे व्यापारीकरण होणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. पैशाच्या प्रलोभनासाठी देवाचाच बाजार मांडला जात असल्याची भावना भाविकांमध्ये निर्माण होत आहे.”

ही परिस्थिती बदलण्यासाठी मंदिरांना अधिक स्वायत्तता मिळणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी देशभरात विश्व हिंदू परिषद हिंदू मंदिरांच्या स्वायत्ततेसाठी सातत्याने आवाज उठवत असल्याचे नमूद केले. मंदिर व्यवस्थापनाबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा