*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तुला सांगायचे गेले राहूनच…*
खरंच कित्ती गोष्टी असतात मनात आपल्या
दडलेल्या
सांगू न शकतो माहित नाही कशामुळे अवघडल्या…
पहिली काही वर्षे सरता हुकूमशाही का येते?
प्रीत करूनी मनापासूनी किंमत कमी का होते?
दुय्यम काहो समजतात ही पुरुष माणसे सारी
वरचढ ठरता महिला घरात जड जाते का भारी?
कुठेच कमी नसूनही नारी “म्हणती कळत नाही”
प्रत्येकाला कळतच असते यांना का कळत नाही..
बाहेर वागती वा वा माणूस किती आहे तो छान
घरात येता शिरते वारे उठवती का रान..
बाहेर प्रतिमा स्वच्छ ठेवती घरात गरज नाही
इतकी का हो तुच्छ वाटते घरात यांना बाई..
सर्वस्वाला अर्पून नारी माहेर सोडूनी येते
अनोळखी त्या साऱ्यांशी कित्ती जमवून घेते.
कधी न पाहिले आयुष्यात हो त्यांना आपले म्हणते
जरा जाऊनी पहा सासरी पहा तुम्हाला जमते..
नंदाजावासासूसासरे कष्ट उपसते कित्ती
करून सारे नित्य वाटते मनातून ती भीती..
आधाराचा खांब एकच भरवशावर असते
गुर्मी मध्ये सदा असा तू तुला कधी ना कळते..
बोलायाची नच सोय रे सारे राहून गेले
बायकांचे सारे हेले पाणी वाहून मेले..
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
