सावंतवाडी रुग्णालयातील गंभीर प्रकार बाहेर येऊ नयेत म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांना दूर करण्याचे षडयंत्र?
खोटे आरोप, अपमानास्पद वागणूक आणि दबावामुळे सहा वर्षे सेवा देणारे कार्यकर्ते रुग्णालयापासून दूर; रवी जाधव यांचा गंभीर आरोप
सावंतवाडी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील विविध गैरप्रकार, रुग्णांना दिली जाणारी सेवा, खाजगी रुग्णालयांकडे होणारे रेफरल, तसेच रुग्णांशी होणारी वागणूक यासंदर्भातील माहिती बाहेर जाऊ नये म्हणून काही सामाजिक कार्यकर्त्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले आणि त्यांना रुग्णालयापासून दूर करण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी केला आहे.
जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळापासून गेल्या सहा वर्षांपासून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, सामाजिक जाण असलेले राजकीय पदाधिकारी आणि पत्रकार यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. रुग्णांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवणे, दुर्लक्षित रुग्णांना मदत करणे आणि आवश्यक तेथे हस्तक्षेप करणे अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते बजावत होते.
रुग्णांच्या मदतीमुळे काहींना अडचण?
रुग्णालयात एखादा रुग्ण वेदनेने तळमळत असताना किंवा डॉक्टर, सिस्टर यांची मदत आवश्यक असताना सामाजिक कार्यकर्ते संबंधित कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास बाब आणून देत असत. मात्र, अशा हस्तक्षेपामुळे काही सिस्टर आणि डॉक्टर नाराज होत असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी एका सामाजिक कार्यकर्त्याने घाईगडबडीत एका सिस्टरला आडनावाने हाक मारून एका रुग्णाला सलाईन लावण्याची विनंती केली होती. या घटनेचा विपर्यास करून संबंधित कार्यकर्त्याने धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आणि त्याविरोधात ३६ डॉक्टर व सिस्टर यांच्या सह्यांचे निवेदन रुग्णालय प्रशासनाला देण्यात आले.
सुनावणीला तक्रारदार अनुपस्थित
या प्रकरणाची सुनावणी १५ मे रोजी ठेवण्यात आली होती. मात्र, सुनावणीच्या वेळी तक्रारदार उपस्थित राहिली नसल्याचे सांगण्यात आले. या बैठकीला सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
युनियन लीडरच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
जाधव यांनी आरोप केला आहे की, सुनावणीदरम्यान सिस्टर युनियनच्या नेतृत्वाने सामाजिक कार्यकर्ते आणि रुग्ण कल्याण समिती सदस्यांचा अपमान केला. तसेच भविष्यात सामाजिक कार्यकर्ते, राजकीय व्यक्ती आणि पत्रकारांनी विनाकारण रुग्णालयात येऊ नये, सिस्टरशी संवाद साधू नये, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
याशिवाय, सामाजिक कार्यकर्ते सतत रुग्णालयात येत असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर दबाव निर्माण होतो आणि त्यामुळे काम करताना चुका होतात, असे वक्तव्यही करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कामबंद आंदोलनाची धमकी?
बैठकीत झालेल्या वादानंतर काही सिस्टर आणि डॉक्टरांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी माघार घेत संबंधितांची माफी मागितली आणि त्यांच्याशी समझोता केल्याचेही जाधव यांनी म्हटले आहे.
सेवाभावी कार्यकर्ते २० दिवसांपासून रुग्णालयापासून दूर
गेल्या सहा वर्षांत रुग्णांसाठी दोन लाख रुपयांहून अधिक किमतीचे रुग्णोपयोगी साहित्य उपलब्ध करून देणारे आणि दिवस-रात्र सेवा देणारे कार्यकर्ते मागील वीस दिवसांपासून रुग्णालयात गेले नसल्याचे जाधव यांनी सांगितले. या परिस्थितीसाठी संबंधित डॉक्टर आणि सिस्टर जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गरजू रुग्णांना आता मदत कोण करणार?
सामाजिक कार्यकर्त्यांना रुग्णालयापासून दूर ठेवण्याच्या या प्रकारामुळे भविष्यात गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मदतीच्या वेळी आधार कोण देणार, असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
