सावंतवाडी पोलीस ठाण्यात श्री स्वामी समर्थ पादुकांचे भक्तीमय पूजन
सैनिक बँकेचे महाव्यवस्थापक सुनील राऊळ यांच्या हस्ते पूजा; स्वामी नामाच्या जयघोषात परिसर दुमदुमला
सावंतवाडी
येथील पोलीस ठाण्याच्या आवारातील “श्री औदुंबर स्वामी मंदिरात” नुकतेच श्री स्वामी समर्थ महाराज स्थापित गुरुमंदिर आणि श्री बाळाप्पा महाराज दिव्य गुरु परंपरेचा आशीर्वाद लाभलेल्या स्वामींच्या पवित्र पादुकांचे अत्यंत भक्तीमय वातावरणात पूजन करण्यात आले. या पूजेचा मान सैनिक बँकेचे महाव्यवस्थापक सुनील राऊळ यांना देण्यात आला.
या मंगलमय सोहळ्यात गुरु आनंद ब्रह्म यांनी उपस्थित स्वामी भक्तांना मार्गदर्शन करताना समाजसेवा, अन्नदान आणि सत्कर्मांच्या माध्यमातून स्वामी भक्तीचा प्रसार करण्याचे आवाहन केले. त्यांनी स्वामींच्या सेवेतून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे सांगितले.
या सोहळ्यानिमित्त स्वामी भक्तांसाठी विशेष आध्यात्मिक पर्वणी लाभली होती. श्री स्वामी समर्थ महाराज स्थापित गुरुमंदिर आणि श्री बाळाप्पा महाराज दिव्य गुरु परंपरेचा आशीर्वाद लाभलेल्या, तसेच प्राचीन अग्नी-उपासनामार्ग पुनरुज्जीवित करणारे “परमसद्गुरु श्री गजानन महाराज” यांच्या चिन्मय पादुका तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या भागात परिक्रमेसाठी दाखल झाल्या होत्या. उपस्थित भक्तांच्या साक्षीने त्या पवित्र चिन्मय पादुकांचे विधीवत पूजन करण्यात आले.
या सोहळ्याला सावंतवाडी पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, दुय्यम निबंधक स्नेहल तेरेगावकर आणि माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.
तसेच पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, जिल्हा बँकेचे संचालक रवी मडगावकर, माजी नगरसेवक गुरु मठकर, पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, दीपक म्हापसेकर आणि रंजना निर्मळ यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
हा भक्तिमय सोहळा यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे अमोल टेंबकर, भुवन नाईक, अनिकेत आसोलकर, सचिन मोरजकर, हेमंत पांगम, आनंद काष्टे, प्रणव तारी, यश गाटे, केतन सावंत, ओम टेंबकर, अमित राऊळ, अदिती सावंत, सुरेखा पवार आणि पूजा धोत्रे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान, या सोहळ्यास सावंतवाडी आणि परिसरातील स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. संपूर्ण परिसर “श्री स्वामी समर्थ” नामाच्या जयघोषाने आणि भक्तीरसाने भारावून गेला होता.
