You are currently viewing “लोकमान्य मधु दंडवते” नावाने सावंतवाडी रेल्वे टर्मिनसची नवी ओळख
Oplus_16908288

“लोकमान्य मधु दंडवते” नावाने सावंतवाडी रेल्वे टर्मिनसची नवी ओळख

राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी; प्रवासी संघटनांच्या दीर्घ लढ्याला मोठे यश

सावंतवाडी :

कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते प्रा. मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला देण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता या टर्मिनसची ओळख “लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस” अशी होणार आहे. अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

कोकणातील जनतेची आणि रेल्वे प्रवासी संघटनांची अनेक वर्षांची मागणी अखेर मार्गी लागल्याने सावंतवाडीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने शहरात आणि रेल्वे स्थानकावर पेढे वाटण्यात आले, तर गांधी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील टर्मिनसचे भूमिपूजन २७ जून २०१५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. यावेळी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, माजी खासदार विनायक राऊत तसेच तत्कालीन पालकमंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर उपस्थित होते. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी टर्मिनसच्या दोन टप्प्यातील विकासासाठी १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम अनेक वर्षे रखडले होते.

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या मागणीसाठी सुरुवातीच्या काळात माजी आमदार जयानंद मठकर आणि दीपक केसरकर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाल्यानंतर कामाला वेग आला. पुढे रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी अॅड. संदीप निवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली “सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना” स्थापन करण्यात आली. यामध्ये माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सचिव मिहीर मठकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. संघटना स्थापन झाल्यानंतर सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्यात मोठी चळवळ उभी राहिली.

पंतप्रधान, मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना सातत्याने ई-मेल, निवेदने आणि आंदोलने करून पाठपुरावा करण्यात आला. सावंतवाडी टर्मिनसला प्रा. मधु दंडवते यांचे नाव देणे, रेल्वे गाड्यांना थांबा मिळवून देणे आणि स्थानकावर पाणी भरण्याची सुविधा उपलब्ध करून देणे अशा विविध मागण्यांसाठी संघटनेने सातत्याने लढा दिला. सध्या कासवगतीने स्थानकावरील काम सुरू आहे.

मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर, प्रशांत जयानंद मठकर, अभिमन्यू लोंढे, रेल्वे स्थानक रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आणि अन्य कार्यकर्त्यांनी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसवर जाऊन प्रवासी व कर्मचाऱ्यांना पेढे वाटले. तसेच प्रा. मधु दंडवते यांच्या नावाने घोषणाबाजीही करण्यात आली.

यावेळी मिहीर मठकर म्हणाले, “रेल्वे प्रवासी संघटनेच्या आंदोलनाला आणि सातत्यपूर्ण मागण्यांना आज मोठे यश मिळाले आहे. मठकर कुटुंबाने सुरुवातीपासूनच सावंतवाडी स्थानकावर प्रा. मधु दंडवते यांचे तैलचित्र लावले होते. त्यानंतर कोकणातील ११ रेल्वे स्थानकांवर तैलचित्र लावण्यासाठी निवेदने देण्यात आली होती. प्रवासी संघटनेच्या चळवळीमुळे सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या विकासालाही गती मिळत आहे.”

त्यांनी पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांचे आभार मानले. “रेल्वे टर्मिनस विकासाची नांदी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे,” असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा