You are currently viewing लडाख सीमेवर धुमश्चक्री…..

लडाख सीमेवर धुमश्चक्री…..

दिल्ली
गेल्या तीन महिन्यापासून लडाख सीमेवर भारतीय लष्कर आणि चिनी सैन्याच्या तुकड्या एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या असतानाच सोमवारी रात्री उशिरा येथे गोळीबार झाल्याचे वृत्तामुळे तणावग्रस्त वातावरणात आणखीन भर पडली आहे. भारतीय लष्कराकडून अद्याप तरी या गोळीबाराबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नसून, चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ या सरकारी वृत्तपत्राने गोळीबाराचा दावा केला आहे.
लडाख सीमेवर भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये पुन्हा एकदा धुमश्चक्री झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तसेच भारतीय जवानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून चीनच्या हद्दीत प्रवेश करत गोळीबार केल्याचा आरोप ग्लोबल टाइम्सच्या वृत्तात करण्यात आला आहे.
ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रात चीनच्या वेस्टर्न थिएटरमधील कमांडच्या प्रवक्त्याने हे वृत्त दिले आहे. ‘भारतीय सैन्याने शेनपाओ पर्वतरांगांमध्ये असलेल्या Χपँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पार केली. गस्तीवरील चिनी सैनिक त्यांच्याशी चर्चा करण्याच्या प्रयत्न करत असताना भारतीय जवानांनी समोरून गोळ्या झाडल्या या बदल्यात चिनी सैनिकांनी स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पावले उचलली’ असेही या प्रवक्त्याने ग्लोबल टाईम्स मध्ये सांगितले आहे. परंतु भारताकडून याबाबत अधिकृत निवेदन आल्यानंतरच चीन खरं बोलतंय की, खोटं बोलतंय हे स्पष्ट होईल.
भारतीय लष्कराकडून किंवा भारत सरकारकडून चीनच्या दाव्यावर अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली गेली नाही आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार झाल्याचे तसेच भारत-चीन मध्ये तणावग्रस्त परिस्थिती वाढल्याचे वृत्त दिले आहे.
भारतीय जवानांनी काही दिवसांपूर्वीच ‘चीनच्या कुरापतींना जशास तसे उत्तर देत’ पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील एका महत्त्वाच्या टापूवर कब्जा मिळवून, घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ‘चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या’ (पीएलए) सैनिकांना माघार घेण्यास भाग पडले होते. जून महिन्यात त्याआधी लडाखमध्येच चिनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात कमांडिगं ऑफिसरसह भारताचे २० जवान शहीद झाले होते. मात्र चीनचे त्यावेळी या संघर्षात किती सैनिक मारले गेले, ही माहिती चिनीने समोर आणली नव्हती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 1 =