You are currently viewing प्रशासन व आंगणे कुटुंबीय यांची संयुक्त बैठक संपन्न….

प्रशासन व आंगणे कुटुंबीय यांची संयुक्त बैठक संपन्न….

५०- ५० च्या समुहाने कोरोनाचे नियम पाळून आंगणे कुटुंबीयांना देवीचे दर्शन; जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची माहिती

मालवण

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची दि. ६ मार्च रोजी होणारी जत्रा ही केवळ आंगणे कुटुंबियांपुरतीच असेल, एका वेळी ५० व्यक्ती अशा पद्धतीने ५०- ५० च्या समूहाने सोशल डिस्टन्ससह कोरोनाचे नियम पाळून आंगणे कुटुंबीय व्यक्तींना देवीचे दर्शन घेता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी प्रशासन व आंगणे कुटुंबीय यांच्या संयुक्त बैठकीत दिली. तसेच दर्शनास येणाऱ्या आंगणे कुटुंबियांची कोरोना विषयक आरोग्य तपासणी करूनच मंदिरात प्रवेश देण्यात येईल तसेच आंगणे कुटुंबियांव्यतिरिक्त बाहेरील अन्य कोणत्याही व्यक्तींना जत्रेच्या दिवशी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही असेही यावेळी प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने लागू असलेली जमावबंदी आणि धार्मिक कार्यक्रम व यात्रा यांना राज्य शासनाने बंदी या पार्श्वभूमीवर आज आंगणेवाडी येथे जिल्हा प्रशासन व आंगणे कुटुंबीय यांची जत्रा नियोजनाची महत्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तर बैठकीनंतर जिल्हाधिकारी यांनी मंदिर परिसराची पाहणी करत आवश्यक त्या सूचना केल्या.

यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, आंगणे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे, तहसीलदार अजय पाटणे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सभापती अजिंक्य पाताडे, मालवण पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी, सरपंच सौ. पालव, सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवणचे अभियंता नितीन दाणे, यासह अन्य अधिकारी, आंगणे कुटुंबीय उपस्थित होते. आंगणे कुटुंबीय व्यक्तींची मुख्य प्रवेशद्वारावर कोरोना विषयक आरोग्य तपासणी करण्यात येईल व नंतरच मंदिरात प्रवेश देण्यात येईल असे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी यावेळी स्पष्ट केले. तपासणीसाठी आंगणे कुटुंबियांची दोन माणसे व आरोग्य विभागाचा एक कर्मचारी तैनात ठेवण्यात येतील, तसेच मंदिर परिसरात आपत्कालीन परिस्थितीसाठी आरोग्य पथक तैनात असेल, रुग्णवाहिका देखील उपलब्ध करण्यात येईल, असे यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मिठारी यांनी सांगितले. जत्रेदिवशी मंदिरात पहाटे ४ वाजल्यापासून दर्शनास सुरुवात करण्यात येईल. केवळ आंगणे कुटुंबीय व आंगणे माहेरवाशिणी, जावई, त्यांची मुले यांच्या उपस्थितीत उत्सव पडेल. प्रशासनाच्या सूचनेनुसार दर्शनासाठी येणाऱ्या आंगणे कुटूंबियांना त्यांची ओळखपत्रे देण्यात येणार आहेत, असे यावेळी भास्कर आंगणे यांनी सांगितले. मंदिराकडे येणाऱ्या मालवण, मसुरे व कणकवली अशा तिन्ही मार्गावर बॅरिगेट्स लावून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल. आंगणे कुटुंबियांचे ओळखपत्र असलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त अन्य कोणासही प्रवेश देण्यात येणार नाही, गर्दी होऊ नये तसेच कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मंदिर परिसरात पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात येतील, असे यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सांगितले. मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात येईल. मंदिर परिसरात कोणत्याही वाहनाला प्रवेश दिला जाणार नाही असे यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र यावर्षी ही जत्रा आंगणे कुटुंबियांपुरतीच मर्यादित राहणार असल्याने तसेच गर्दी होऊ नये या कारणास्तव मंदिर परिसरात बाहेरील व्यापारी अथवा स्थानिक व्यापारी यांना कोणत्याही प्रकारचा स्टॉल उभारता येणार नाही. तसेच मंदिर परिसरात स्थानिक ग्रामस्थांचे जे कायमस्वरुपी हॉटेल, दुकाने व स्टॉल आहेत ते देखील जत्रे दिवशी बंद ठेवण्यात यावेत अशा स्पष्ट सूचना यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या. बैठकी नंतर पत्रकारांशी बोलताना पोलीस निरीक्षक श्री ओटवणेकर यांनी नियमांचे पालन करूनच ही जत्रा संपन्न होईल, असे स्पष्ट केले. तसेच ही जत्रा आंगणे कुटुंबियांची असल्याने आंगणे कुटुंबीयांव्यतिरिक्त राजकीय नेते, पत्रकार व अन्य व्यक्तींना प्रशासन मंदिरात प्रवेश देऊ शकत नाही यावेळी प्रशासन व पोलीस यंत्रणेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × one =