You are currently viewing डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीचा प्रकल्प मिशन आयएएस
Oplus_16908288

डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीचा प्रकल्प मिशन आयएएस

अमरावती :

महाराष्ट्राचे अपर मुख्य सचिव सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी श्री विकास खारगे व प्रधान आयकर आयुक्त श्री अभिनय कुंभार पुणे व आयएएस अधिकारी श्री दिलीप स्वामी यांच्या सहकार्याने सुरू झालेली अमरावतीची डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी आज संपूर्ण भारतामध्ये स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये फक्त एक रुपया प्रतिदिन एवढ्या अल्प शुल्कामध्ये मिशन आयएएस अंतर्गत विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्गापासून स्पर्धा परीक्षेसाठी तयार करीत आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना त्या त्या वर्गाची स्पर्धा परीक्षेची पुस्तके विनामूल्य देणारी ही भारतातील पहिली संस्था आहे. त्यांची टेस्ट सिरीज घेणारी त्यांची वार्षिक परीक्षा घेणारी व त्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क न आकारणारी ही आगळीवेगळी संस्था आहे. उलट आज स्पर्धा परीक्षा हा एक व्यवसाय झालेला आहे. पण पंचवीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या डॉ.पंजाबराव देशमुख अकादमीने या व्यवसायापासून स्वतःला दूरच ठेवले. आजच्या तारखेला या अकादमीमध्ये 373 आयएएस आयपीएस आयआरएस आयएफएस सनदी व राजपत्रित अधिकारी प्रत्यक्ष मार्गदर्शन करायला

येऊन गेले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने सनदी व राजपत्रित अधिकारी येणारी ही भारतातील एकमेव संस्था आहे.

 

या संस्थेची सुरुवात आताचे प्रधान आयकर आयुक्त श्री अभिनय कुंभार पुणे यांच्या भेटीने झाली. ते 2000 साली आयएएसची परीक्षा पास झाली होती. प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे हे त्यावर्षी सांगली जिल्ह्यातील शिराळा या त्यांच्या गावी त्यांचा सत्कार करायला गेले. या सत्कार प्रसंगी श्री अभिनय कुंभार यांनी ही परीक्षा मराठीत देता येते. पस्तीस टक्के गुण प्राप्त विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात .पूर्व परीक्षा पास होण्यासाठी 25% गुण लागतात. शिवाय या परीक्षेमध्ये येणारे प्रश्न हे वस्तुनिष्ठ म्हणजेच बहुपर्यायी असतात. ह्या गोष्टी त्यांना सांगितल्या. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी अमरावतीला 12 मे 2000 या दिवशी अमरावतीच्या दंत महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतली. ही अमरावती शहरातील पहिली स्पर्धा परीक्षा कार्यशाळा. या कार्यशाळेचे उद्घाटन तत्कालीन यवतमाळ जिल्हाधिकारी व आताचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेसाठी नुकतेच आय ए एस झालेले श्री अभिनय कुंभार हे सांगली जिल्ह्यातील शिराळा गावचे सुपुत्र मुद्दाम आले होते. इतिहासात नोंद करणारी ही कार्यशाळा झाली. ती तब्बल 12 तास चालली. अभिनय कुंभार प्रसन्न ट्रॅव्हलच्या गाडीमध्ये बसेपर्यंत मुलांचा घोळका त्यांच्याबरोबर होता. सुरुवात झाली ती अशी.

 

त्यानंतर प्रा.काठोळे यांनी अभ्यासिका व ग्रंथालय सुरू करण्यासाठी अमरावती शहरातील शैक्षणिक परिसर असलेल्या गाडगे नगर राठी नगर राधानगर या ठिकाणी हॉल शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्या काळात शिकवण्या या घरीच व्हायच्या .शहरात कुठेही अभ्यासिका नव्हती .कोचिंग क्लास नव्हता .त्यामुळे या पाचशे एकराच्या परिसरामध्ये त्यांना कोणीही भाड्याने देखील हॉल द्यायला तयार झाला नाही. यावेळेस त्यांच्या सौभाग्यवती विद्या काठोळे त्यांच्या मदतीला धावून आल्या. त्यांनी अमरावती विद्यापीठ रोडवरील महापौरांच्या बंगल्यासमोरील जिजाऊ नगर मध्ये आपला राहता बंगला ग्रंथालय व अभ्यासिका या उपक्रमासाठी देण्याचे ठरविले. सौ विद्या ह्या स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांच्या कन्या आहेत. त्यांचे आजोबा आजी देखील स्वातंत्र्यसंग्रामात होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये हा सेवाभाव होता .या ग्रंथालय व अभ्यासिकेचे उद्घाटन आताचे आयएएस अधिकारी श्री दिलीप स्वामी व सेवानिवृत्त आय ए एस अधिकारी श्री सदानंद कोचे व सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉ. मोतीलाल राठी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

 

या पंचवीस वर्षात डॉक्टर पंजाबराव देशमुख अकादमीने संपूर्ण भारतात 18000 च्या वर विनामूल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेऊन एक जागतिक विक्रम केला. मानधनाची अपेक्षा ठेवली नाही. प्रवास खर्चाची अपेक्षा ठेवली नाही. सोय गैरसोय पाहिली नाही.

पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे हे काम होत होते आणि आजही सुरू आहे. एखादा उपक्रम 25 वर्षे चालतो आणि तोही प्रतिदिन एक रुपया इतक्या अल्प शुल्कामध्ये चालतो. यामध्ये या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे मन गुंतलेले असते. प्राण त्यांनी ओतलेला असतो आणि म्हणूनच आज मिशन आय ए एस चळवळ ही अमरावती पासून जम्मू कश्मीर पर्यंत आणि जम्मू कश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेली आहे. अर्थात असे काम सोपे नाही. त्यासाठी प्रा. डॉ. काठोळे व त्यांच्या चमूने झोकून दिलेले आहे हे तितकेच खरे आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या या उपक्रमाला संपूर्ण भारतातून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. संस्थेने जम्मू कश्मीर तसेच नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हा तामिळनाडू उत्तर प्रदेश झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान ओरिसा दिल्ली हिमाचल प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात या राज्यामध्ये सातत्याने स्पर्धा परीक्षा घेऊन तिथल्या विद्यार्थ्यांना देखील जागे करण्याचे काम केले आहे. अगदी उत्तर प्रदेश मधील गोरखपूर भागात देखील संस्थेने सलग बावीस दिवस स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेऊन उत्तर प्रदेश मधील मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार केलेले आहे. अशाप्रकारे विनामूल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेणारी ही भारतातील पहिली अकादमी आहे.

 

संस्थेने आतापर्यंत स्पर्धा परीक्षांची 72 पुस्तके प्रकाशित केली असून संस्था दरवर्षी नियमितपणे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मे महिन्यामध्ये स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर आयोजित करते. वर्षी संस्थेचा रोप्य महोत्सव असल्यामुळे संस्थेने अमरावती परतवाडा रोडवरील सिकची रिसॉर्ट या वातानुकूलित रिसॉर्ट मध्ये 16 मे ते 22 मे या दरम्यान सात दिवसाची सात दिवसांचे स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरामध्ये 8 आयएएस आयपीएस व 10 सनदी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करण्यासाठी येण्याचे मान्य केलेले आहे.

 

याशिवाय संस्थेने स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संमेलन घेऊन अमरावती शहरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा संमेलने घेऊन संस्थेने एक वेगळा पायंडा पाडला आहे. आतापर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीने तीन स्पर्धा परीक्षा संमेलने घेतली असून पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे मुख्य सचिव श्री जे पी डांगे हे होते तर दुसऱ्या स्पर्धा परीक्षा संमेलनाचे अध्यक्ष राष्ट्रपतींचे विशेष कार्यकारी अधिकारी व सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी श्री रवींद्र जाधव हे होते तर तिसऱ्या स्पर्धा परीक्षा संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध आयएफएस अधिकारी व वन संरक्षक श्री रंगनाथ नाईकडे होते. यावर्षीचे चौथे स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संमेलन दिनांक 6 7 8जून 2026 रोजी सिकची रिसॉर्ट येथे होत असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध आय ए एस अधिकारी डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचे निवड करण्यात आली आहे.

 

डॉ.पंजाबराव देशमुख अकादमीने मिशन आयएएस हा प्रकल्प सातत्याने 25 वर्षे राबवून महाराष्ट्रात तसेच इतर राज्यात स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत व्यापक जनजागृती केली आहे. महाराष्ट्रात तर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला .ज्या महाराष्ट्रात फक्त 2000 यावर्षी 23 मुले आयएएस ही परीक्षा पास होत होते हा आकडा आता 100 च्या वर गेला आहे. हा आकडा 100 च्या वर नेण्यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीचा निश्चितच खारीचा वाटा आहे. सर्वश्री अविनाश धर्माधिकारी तुकाराम जाधव अमोल पाटील यजुर्वेद महाजन राम वाघ मिलिंद लाहे सागर भस्मे सारख्या स्पर्धा परीक्षा तज्ञांनी आकडा 100 पर्यंत पोहोचविण्यासाठी निश्चितच प्रयत्न केलेले आहेत. पण कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेता प्रवास करताना घेता मानधन न घेता समर्पण भावनेने डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीने हा आकडा वाढविण्यासाठी अंतःकरणापासून प्रयत्न केला आहे व तो सफल झाला आहे. यातच अकादमीच्या सफलतेचे गमक आहे.

 

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक

मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

प्रतिक्रिया व्यक्त करा