लघुउद्योग व नवउद्योजकांना हक्काचे व्यासपीठ; १५ ते १७ मे दरम्यान भव्य प्रदर्शन
वेंगुर्ला :
लघुउद्योग व नवउद्योजकांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ‘आरंभ – नव्या उद्योगाचा’ या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १५ ते १७ मे २०२६ दरम्यान श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार, १५ मे रोजी वेंगुर्ला शहरातील महिला नगरसेविकांच्या शुभहस्ते होणार आहे. प्रदर्शनामध्ये लघुउद्योग, गृहउद्योग तसेच नव्याने व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजकांना विशेष प्राधान्य देण्यात आले असून हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार असल्याची माहिती संयोजक मोनाली वर्दम व कृतिका कोरगावकर यांनी दिली.
‘आरंभ – नव्या उद्योगाचा’ या प्रदर्शनाचे हे पहिलेच वर्ष असून कणकवलीनंतर प्रथमच वेंगुर्ला शहरात अशा प्रकारचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विविध व्यावसायिकांकडून प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक आकर्षक स्टॉल्स सहभागी होणार आहेत.
या प्रदर्शनात गृहसजावटीच्या वस्तू, हस्तकला, मसाले, अत्तर, दागिने, कपडे, कोकणी मेवा, बॅग्स, घरगुती खाद्यपदार्थ, शालेय साहित्य तसेच मेटलमधील आकर्षक कार मॉडेल्स यांसारख्या विविध वस्तूंचा समावेश असणार आहे.
यावर्षीच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे “लकी ड्रॉ” असून दररोज एका भाग्यवान विजेत्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून लहानांपासून प्रौढांपर्यंत सर्वांना एकाच ठिकाणी खरेदीचा आनंद घेण्याची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे.
