अंघोळीसाठी गेलेल्या शाळकरी मुलींवर काळाचा घाला; करुळ गावावर शोककळा
वैभववाडी / प्रतिनिधी :
करुळ जामदारवाडी धरणात तीन मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ४ च्या सुमारास घडली. मृत मुली या शाळकरी असून दोघी करुळ भोयडेवाडी येथील तर एक कुसूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे करुळ गावावर शोककळा पसरली आहे.
करुळ जामदारवाडी येथील धरणात अंघोळीसाठी गेलेल्या तन्वी अनंत माळकर (१६, करुळ), स्वरा संदीप सुर्वे (११, कुसूर) आणि ऋतिका संतोष पाटील (१४, करुळ) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेल्या तिघांचे प्राण मात्र बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चार तरुणी आणि दोन तरुण असे एकूण सहाजण धरणात अंघोळीसाठी गेले होते. यावेळी पोहण्याचा मोह आवरता न आल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघी जणी पाण्यात बुडाल्या. बराच वेळ त्या दिसून न आल्याने सोबतच्या सहकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
ग्रामस्थांनी तातडीने तिघींना पाण्याबाहेर काढले. मात्र त्यांना वाचविण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली असून या दुर्दैवी घटनेप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.
