भीषण अपघातात मोटरसायकल स्वार संतोष गेनू चव्हाण जागीच ठार

भीषण अपघातात मोटरसायकल स्वार संतोष गेनू चव्हाण जागीच ठार

मालवण कसाल हमरस्त्यावरील साई मंदिर नजीकच्या एका धोकादायक वळणावर स्विफ्ट कार आणि मोटरसायकल यांच्यात आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकल स्वार संतोष गेनू चव्हाण, रा. मालवण- धुरीवाडा हे जागीच ठार झाले संतोष चव्हाण हे पणदूर येथील शिवाजी इंग्लिश स्कुलचे शिक्षकेतर कर्मचारी आहेत.

 मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी इंग्लिश स्कुल पणदूर तिठाचे शिक्षकेतर कर्मचारी संतोष चव्हाण हे आपल्या ताब्यातील मोटरसायकल (एम.एच. ०७ एई ४९३८ ) घेऊन कसाल येथून मालवणच्या दिशेने जात होते. चव्हाण यांची मोटरसायकल सुकळवाड येथील वळणावर आली असताना याच दरम्यान काळसेहून ओरोस येथे जात असलेल्या योगेश राऊळ यांच्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर कार (क्र. एम एच ०७ टी २१४२) आली असता कार व मोटरसायकल या दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक बसली.

या धडकेत मोटरसायकलस्वार संतोष चव्हाण हे मोटारसायकलवरून रस्त्यावर फेकले गेल्याने त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती ओरोस पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेची ओरोस पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

पणदूर हायस्कुलचे शिक्षकेतर कर्मचारी संतोष चव्हाण यांच्या अपघाती निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. मालवणच्या भंडारी हायस्कुलच्या शिक्षिका अनिता चव्हाण यांचे ते पती होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा