दोडामार्ग पंचायत समितीची आमसभा १३ ऑगस्टला
महालक्ष्मी हॉलमध्ये सकाळी १०.३० वाजता सभा; विविध विकासकामांचा होणार आढावा
दोडामार्ग :
पंचायत समिती दोडामार्गची शुक्रवार, ७ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली आमसभा अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही आमसभा गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता महालक्ष्मी हॉल, दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आली आहे.
मा. ना. श्री. दीपक वसंत केसरकर, आमदार सावंतवाडी मतदारसंघ यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. सभेत मागील बैठकीतील मंजूर ठरावांवरील कार्यवाहीस मान्यता देणे, मागील सभेतील सूचनांवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचे वाचन करणे तसेच दोडामार्ग तालुक्यात सन २०२५-२६ मध्ये झालेल्या कामांचा विभागवार आढावा घेण्यात येणार आहे.
तसेच सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात करावयाच्या कामकाजाची रूपरेषा निश्चित करण्याबाबत चर्चा होणार आहे. अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी उपस्थित होणाऱ्या विषयांवरही चर्चा करण्यात येणार आहे.
या आमसभेस संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आमसभा सचिव तथा गटविकास अधिकारी, पंचायत समिती दोडामार्ग यांनी केले आहे.
