You are currently viewing मळगाव घाटीत आंबा घेऊन येणारी इको कार ५० फूट दरीत कोसळली

मळगाव घाटीत आंबा घेऊन येणारी इको कार ५० फूट दरीत कोसळली

मळगाव घाटीत आंबा घेऊन येणारी इको कार ५० फूट दरीत कोसळली

पावसामुळे निसरडा रस्ता ठरला अपघातास कारणीभूत; दोघे बालंबाल बचावले, धोकादायक वळणांवर उपाययोजनांची मागणी

सावंतवाडी :

सावंतवाडी-मळगाव मार्गावरील मळगाव घाटीत बुधवारी पहाटे आंबा घेऊन येणारी इको कार सुमारे ५० फूट दरीत कोसळून भीषण अपघात झाला. पहाटे झालेल्या पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट दरीत कोसळली. सुदैवाने, कारमधील दोघेजण या अपघातातून बालंबाल बचावले असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मातोंड-पेंडूर येथील बागायतदार बुधवारी पहाटे आपल्या इको कारमधून आंबे घेऊन सावंतवाडीच्या दिशेने येत होते. मळगाव घाटातील तीव्र वळणावर पहाटे पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर रुंबडाच्या झाडाची फळे पडून रस्ता अत्यंत निसरडा झाला होता. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटून कार कडेला घसरत पलटी घेत थेट दरीत कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, पेंडूर सरपंच संतोष गावडे, उमेश दळवी यांच्यासह स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले. कारमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
दरम्यान, महिनाभरात याच धोकादायक वळणावर झालेला हा दुसरा मोठा अपघात असल्याने स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी सावंतवाडीतील एका कुटुंबाची कार दरीत कोसळून सात जण जखमी झाले होते.
घाटातील तीव्र वळणे, तुटलेले संरक्षक कठडे, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि पावसाळ्यात निसरडे होणारे रस्ते यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.

सार्वजनिक बांधकाम विभागावर नाराजी

पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी तुटलेले रेलिंग आणि संरक्षक कठडे तातडीने दुरुस्त करावेत, तसेच पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील धोकादायक झाडांच्या फांद्या हटवून सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी यापूर्वी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत केली होती.
मात्र, वीस दिवस उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. आगामी पंचायत समिती बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येणार असून, आवश्यक उपाययोजना न झाल्यास ग्रामस्थ व वाहन चालकांच्या सहकार्याने आंदोलन आणि उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी मळगाव घाटीत मजबूत गार्डरेल, वेगमर्यादा फलक, रिफ्लेक्टर्स आणि सुरक्षाव्यवस्था तातडीने उभारण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा